

सोलापूर : घरी पाणी भरत असताना तरुणाला पाण्याच्या मोटारीतील विजेचा जोरदार धक्का बसला. उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला.
गणेश मनीष कांबळे (वय २२, रा. जीवन विकास नगर, कुमठा नाका) असे मृत तरुणाचे नाव आहे. सहा दिवसांआढ पाणीपुरवठा होत असल्याने रविवारी कुमठा नाका परिसरात पाणी भरण्यासाठी नागरिकांची लगबग सुरू होती. त्यावेळी ही घटना घडली.
कामावर जायचे असल्याने नऊ वाजता पाणी आल्यानंतर गणेशने मोटार सुरू केली. पाणी भरत असतानाच अचानक त्याला विजेचा जोरदार धक्का बसला. ही घटना त्याच्या काकांनी पाहिली. त्यांनी तातडीने गणेशला खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्याचा मृत्यू झाल्याचे सांगितले. गणेशने इंजिनिअरिंग पूर्ण केले होते. घरची परिस्थिती नाजूक असल्याने तो मेडिकलमध्ये काम करत होता. त्याच्या पश्चात आई, भाऊ आणि बहीण असा परिवार आहे. गणेशचे मित्र व नातेवाईकांनी सोलापूर शासकीय रुग्णालयात गर्दी केली. दुपारी शवविच्छेदन केले.