

सोलापूर : महापालिकेच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक सात सध्या सर्वाधिक चर्चेचा केंद्रबिंदू ठरत आहे. येथील लढत केवळ नगरसेवक पदापुरती मर्यादित न राहता थेट आगामी विधानसभा निवडणुकीची चाचणी मानली जात आहे. भाजप आणि शिवसेना (एकनाथ शिंदे गट) यांच्यातील सामना दिवसेंदिवस अधिक तीव्र होत चालला असून आरोप प्रत्यारोपांचे फड रंगले आहेत.
महापालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी शेवटचे दोन दिवस शिल्लक राहिले आहेत. प्रचाराच्या शेवट्या टप्प्यात प्रभाग सात मध्ये भाजप आमदार विरूध्द शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे अमोल शिंदे यांच्या सुप्त संघर्ष आता उघड झाला आहे. भाजपाचे आमदार देवेंद्र कोठे यांनी प्रभाग 7 मध्ये मीच उमेदवार आहे असे भाकीत केल्यानंतर राजकीय वातावरण चांगलेच तापले. त्यांच्या या वक्तव्यानंतर शिवसेना (शिंदे गट)चे नेते अमोल शिंदे यांनी आक्रमक पवित्रा घेत थेट आमदार कोठे यांना ओपन चॅलेंज दिले आहे. जर देवेंद्र कोठे हेच या प्रभागाचे उमेदवार असतील, तर माझी खरी लढत त्यांच्याशीच आहे, असे स्पष्ट करत अमोल शिंदे यांनी मैदानात जोरदार शड्डू ठोकला आहे.
यापूर्वीच या प्रभागातील इतर संभाव्य उमेदवारांनी केव्हाच मैदान सोडल्याचा दावा अमोल शिंदे यांनी केला आहे. त्यामुळे ही लढत थेट दोन बड्या नेत्यांमध्येच होणार, असे संकेत मिळत आहेत. महापालिकेतील प्रभाग 7 मधील सर्व पॅनल विजयी झाल्यानंतर आगामी विधानसभा निवडणुकीत मध्य विधानसभा मतदारसंघात आपलीच गाठ पडणार, असा खणखणीत इशाराही अमोल शिंदे यांनी दिला. दुसरीकडे आमदार देवेंद्र कोठे यांनीही आपल्या भूमिकेवर ठाम राहत प्रभाग 7 हीच खरी राजकीय चाचणी असल्याचे सूचित केले आहे. महापालिकेच्या निवडणुकीतून विधानसभा समीकरणे ठरवण्याचा दोन्ही बाजूंचा प्रयत्न स्पष्टपणे दिसून येत आहे.एकूणच, प्रभाग 7 मधील ही लढत भविष्यातील विधानसभा संघर्षाची नांदी ठरणार का, याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे. येत्या काळात या आरोपप्रत्यारोपांचे पडसाद अधिक तीव्र होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवली जात आहे.
गत महापालिका निवडणुकीत एकसंघ शिवसेनेच्या माध्यमातून देवेंद्र कोठे आणि अमोल शिंदे एकाच पॅनेलमधून नगरसेवक झाले होते. महापालिकेत एकत्र काम केल्यानंतर विधानसभा निवडणूकीत देवेंद्र कोठे शहरमध्य विधानसभा मतदारसंघातून आमदार झाले तर अमोल शिंदे एकनाथ शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख झाले. कोठे यांना उमेदवारी जाहीर झाल्यापासून आ. कोठे आणि शिंदे यांच्यात सुप्त संघर्ष चालू होता. त्यानंतर प्रभाग सात मधिल उमेदवारीचा प्रश्नावरून वाद उफाळुन आला आता महापालिकेच्या प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात वाद टोकाला गेल्याचे दिसून येत आहे.