

पंढरपूर : पंढरपूर नगरपरिषदेच्या मतदानादिवशी प्रभाग क्रमांक 16 मधील खोली क्रमांक 1 मध्ये विना परवानगी मतदान कक्षात प्रवेश करीत मोबाईलमध्ये आतील आणि ईव्हीएमचे फोटो काढून निवडणूक प्रक्रियेच्या गोपनीयतेचा भंग केल्याप्रकरणी अनोळखी पाच जणांविरूद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पंढरपूर नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मंगळवारी (दि.2) शहरातील 97 बुथवर मतदान प्रक्रिया पार पडली. यादरम्यान, दुपारी सारडा भवन शेजारील नगरपरिषद ऊर्दू शाळा क्र. 16 मधील खोली क्र. 1 मध्ये असलेल्या बुथवरील ईव्हीएमचे बटन दबले जात नसल्याची आणि मशीनवर चिन्हाजवळ शाईच्या खुणा दिसत असल्याची माहिती तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार डॉ. प्रणिता भगीरथ भालके यांना मिळाली होती. त्यानुसार तत्काळ डॉ. भालके यांनी मतदान बुथवर भेट दिली.
स्वत: प्रतिनिधी असल्याने त्यांना मतदान कक्षात प्रवेश दिला गेला. त्यांनी संबंधित ईव्हीएमची पाहणी करून नियुक्त अधिकाऱ्यांकडे तक्रार केली. यावेळी डॉ.भालके यांनी निवडणूक चिठ्ठ्या वाटपाविषयीही पोलिस कर्मचाऱ्यांवर आक्षेप घेत वरिष्ठांकडे दाद मागितली. उपविभागीय पोलिस अधिकारी प्रशांत डगळे यांनी तेथे दाखल होत माहिती घेतली आणि पुढील मतदान प्रक्रिया सुरळीत सुरू केली. याबाबतचे व्हिडीओ व्हायरल झाले होते.
यादरम्यान, इतर अनोळखी पाच लोकांनी विना परवानगी मतदान कक्षात प्रवेश केला. महिला पोलिस कर्मचारी मंगल बुराडे यांनी अडवूनही जुमानले नाही. त्यांनी मोबाईलमध्ये आतील बाजुचे आणि ईव्हीएमचे फोटो काढून निवडणूक प्रक्रियेच्या गोपनीयतेचा भंग केला, अशा आशयाची फिर्याद केंद्र प्रमुख दशरथ हरिश्चंद्र मोरे (रा. पंढरपूर) यांनी मध्यरात्रीनंतर पोलिसांत दिली असून पुढील अधिक तपास पोलिस हवालदार कुंदन कांबळे हे करीत आहेत.