

सोलापूर : सोलापूर महानगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी सध्या शिगेला पोहोचली आहे. शहरातील 26 प्रभागांमधील राजकीय चुरस वाढली असतानाच, यंदाच्या प्रचारात एक विशेष चित्र पाहायला मिळत आहे. शनिवार आणि रविवारच्या सुट्ट्यांचा फायदा घेत किशोरवयीन मुलांची मोठी फौज उमेदवारांच्या प्रचारात उत्साहाने उतरली असल्याचे पहायला मिळाले.
सकाळपासून रात्रीपर्यंत राबता
सकाळी उठल्यापासून ते रात्री उशिरापर्यंत पदयात्रा, कोपरा सभा आणि रॅलीमध्ये ही मुले अग्रभागी दिसत आहेत. हातात पक्षाचे झेंडे, गळ्यात उपरणे आणि ओठांवर लाडक्या उमेदवाराच्या घोषणा देत ही मुले गल्लीबोळ दणाणून सोडत आहेत. ही पिढी तंत्रज्ञानात तरबेज असल्याने, केवळ घोषणाबाजीच नव्हे तर उमेदवारांचे रिल्स बनवणे आणि व्हॉट्सॲप स्टेटसद्वारे प्रचार करण्याची धुराही त्यांनी समर्थपणे पेलली आहे. पॉकेटमनी अन् मेजवानीचे आकर्षण केवळ हौस म्हणूनच नव्हे, तर अनेक ठिकाणी पॉकेटमनी आणि प्रचाराच्या निमित्ताने मिळणाऱ्या खाऊ-पिऊच्या मेजवानीमुळे ही मुले आकर्षित होत आहेत.
काही ठिकाणी कौटुंबिक राजकीय वारशामुळे मुले मैदानात आहेत, तर काही केवळ कुतूहल म्हणून सहभागी होत आहेत. सध्या अभ्यासाचा ताण नसल्याने मित्रांसोबत रॅलीत फिरताना मजा येते, अशी भावना एका विद्यार्थ्याने व्यक्त केली. या मुलांच्या सहभागामुळे प्रचारात यंग ब्रिगेडची नवी ऊर्जा दिसत असली, तरी पालकांनी त्यांच्या शिक्षणाकडे दुर्लक्ष होऊ देऊ नये, अशी चर्चाही रंगत आहे.
प्रचाराच्या रॅलीमध्ये किशोरवयीन मुलांचा जोश भारीच आहे. आमचा उमेदवार, आमचा आधार, एकच वादा, ... दादा! विजयी करा विजयी करा... अशा लयबद्ध घोषणांनी शहरातील रस्ते दणाणून जात आहेत. मोठ्या आवाजात दिल्या जाणाऱ्या या घोषणांमुळे प्रचारात जिवंतपणा येत असून, मुलांच्या या आवाजाच्या जोरावर उमेदवारही आपला प्रभाव पाडण्याचा प्रयत्न करत आहेत.
पुस्तकांऐवजी हाती पक्षाचे झेंडे
निवडणुकीच्या निमित्ताने सोलापूरच्या गल्लीबोळात किशोरवयीन मुलांचा संचार वाढला आहे. परीक्षेचा ताण बाजूला सारून ही मुले सध्या उमेदवारांचे ब्रँड ॲम्बेसेडर बनली आहेत. गळ्यात उपरणे आणि हातात झेंडे घेतलेल्या या मुलांसाठी प्रचाराची रॅली म्हणजे एक प्रकारे इव्हेंट ठरत आहे. घोषणाबाजीतील त्यांचा उत्साह पाहून उमेदवारही सुखावले असून, या बालशक्तीमुळे प्रचारात मोठी रंगत आली आहे.