

सोलापूर : शहरातील अत्यंत गजबजलेला भाग असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात एका 60 वर्षीय वृद्धाला अचानक फिट आल्याने रस्त्यावर कोसळला. तब्बल तीन तास हा वृद्ध मदतीसाठी तडफडत होता, मात्र कोणी मदतीला धावले नाही.
सोमवारी (दि. 23) माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडली. एसटी स्थानकामुळे या भागात प्रवाशांची आणि नागरिकांची मोठी वर्दळ असते. या चौकातील एका इमारतीत 4 ते 5 नामांकित मेडिकल स्टोअर्स आहेत. किमान आरोग्याशी संबंधित क्षेत्रातील लोक तरी मदतीला धावतील, अशी अपेक्षा होती. मात्र, सर्वजण केवळ बघ्याची भूमिका घेत राहिले. दुपारी एक वाजण्याच्या सुमारास पुण्याच्या एका व्यक्तीने माणुसकी दाखवत 108 रुग्णवाहिकेला कॉल केला. परंतु, बराच वेळ रुग्णवाहिका न आल्याने अखेर एका स्थानिक नागरिकाच्या मदतीने रिक्षातून या वृद्धाला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मेडिकल हब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सोलापुरात मदतीसाठी कोणीही पुढे न आल्याची खंत व्यक्त होत आहे.