Devendra Fadnavis : दुष्काळग्रस्तांच्या बँक खात्यात थेट मदत

मुख्यमंत्री फडणवीस यांची घोषणा; सोलापूर जिल्ह्यात दुष्काळ पाहणी दौरा
Devendra Fadnavis : दुष्काळग्रस्तांच्या बँक खात्यात थेट मदत
Published on
Updated on

सोलापूर : गरज भासल्यास सोलापूर जिल्ह्यात त्वरित चारा छावण्या सुरू करता येतील. जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर औपचारिक पंचनाम्यांच्या फेऱ्यात न अडकता शेतकऱ्यांना सरसकट मदत देण्याबाबत शासन सकारात्मक विचार करत आहे. रब्बी हंगामासाठीही शेतकऱ्यांना मदत करण्याची शासनाची भूमिका असून, बाधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट मदत पोहोचवली जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.

सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस जिल्हा दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी बार्शी आणि उत्तर सोलापूर तालुक्यातील दुष्काळी स्थितीची पाहणी केली. प्रत्यक्ष शेतशिवारास भेटी देऊन त्यांनी पावसाअभावी वाळलेल्या पिकांची माहिती घेतली. यावेळी संबंधित शेतकऱ्यांशी त्यांनी संवाद साधला. त्यांच्या समावेत पालकमंत्री जयकुमार गोरे, आ. राजेंद्र राऊत, आ. विजयकुमार देशमुख, आ. सचिन कल्याणशेट्टी, जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन, मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते.

दुष्काळी परिस्थितीची पाहणी झाल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, अतिशय दुष्काळी परिस्थिती पाहतोय. हा सोयाबीनचा पट्टा असून, तब्बल ९० हजार हेक्टर क्षेत्रात सोयाबीन लागवड होती. ते सर्व वाया गेलेले असून, थोडाफार पाऊस पडल्यामुळे वरून हिरवे दिसत असले तरी त्याला शेंगा नाहीत. राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे आहे. दोन दिवसांमध्ये याबाबतचा जीआर काढला जाईल.

संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सोलापूरच्या दौऱ्यावर येणार असल्याची बातमी समजताच गनिमी कावा करून आंदोलनाच्या तयारीत असलेल्या संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. हे कार्यकर्ते करपलेले सोयाबीन गाडीत घेऊन मुख्यमंत्र्यांना देणार होते. मात्र पोलिसांनी तुम्हाला मुख्यमंत्र्यांची भेट घालून देतो, असा उलट गनिमी कावा करून सर्वांना ताब्यात घेतले.

सर्वांनाच मदत करण्याचे आमचे धोरणः मुख्यमंत्री

शेतकऱ्यांना थेट मदतीबरोबरच जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न, इतर प्रश्न मार्गी लावले जातील. सर्वांनाच मदत करण्याचे आमचे धोरण असून, कोणालाही अडचण निर्माण होणार नाही या दृष्टीने आमचे प्रयत्न सुरू आहेत. यंदा जूनच्या सुरुवातीला चांगला पाऊस झाल्याने पेरण्या वेळेत झाल्या होत्या. मात्र, जुलै आणि ऑगस्ट महिन्यात पावसाने दीर्घ खंड दिल्याने पिके करपून गेली आहेत. अनेक ठिकाणी दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे. बार्शी तालुक्यात कुसळंब, धानोरे, पांगरी, वैराग परिसरात सर्वाधिक फटका बसला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

पुणे शहरातील सर्व अपडेट्स आता WhatsApp वर; आत्ताच जॉईन करा
logo
Pudhari News
pudhari.news