Solapur Drought : पूर्व माळशिरस भागामध्ये दुष्काळाच्या झळा तीव्र

हातातोंडाशी आलेले पीक वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू; नीरा नदीत पाणी सोडण्यासाठी शेतकरी आक्रमक
Solapur Drought : पूर्व माळशिरस भागामध्ये दुष्काळाच्या झळा तीव्र
Published on: 
Updated on: 
गोपाळ लावंड

माळीनगर : माळशिरस तालुक्याच्या पूर्व भागात दुष्काळाची तीव्रता वाढत असून, पाण्याअभावी शेतकरी हवालदिल झाले आहेत. शेतातील उभी पिके जळू लागल्याने शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभे राहिले आहे. लुमेवाडी बंधाऱ्यासह बिजवडी, तांबवे, ओझरे, गणेशगाव आणि संगम परिसरातील शेतकऱ्यांना पाणीटंचाईचा तीव्र सामना करावा लागत आहे. त्यामुळे नीरा नदीमध्ये तातडीने पाण्याचा विसर्ग करून परिसरातील बंधारे भरून द्यावेत, अशी आक्रमक मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.

पूर्व माळशिरस भागातील शेती मोठ्या प्रमाणावर नीरा नदीच्या पाण्यावर, बंधाऱ्यांमधील जलसाठ्यावर तसेच विहिरी आणि बोअरवेलवर अवलंबून आहे. मात्र, पाण्याचे स्रोत आटत चालल्याने शेतीला पाणी देणे कठीण झाले आहे. अनेक शेतांमधील पिके पाण्याअभावी कोमेजू लागली असून, काही ठिकाणी पिके जळण्याच्या मार्गावर आहेत. हातातोंडाशी आलेले पीक वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू आहे.

लुमेवाडी बंधारा तसेच बिजवडी, तांबवे, ओझरे, गणेशगाव आणि संगम परिसरातील बंधाऱ्यांमध्ये पाणीसाठा उपलब्ध झाल्यास परिसरातील विहिरींच्या पाणीपातळीत वाढ होण्यास मदत होईल. परिणामी शेतीसाठी पाणी उपलब्ध होऊन उभी पिके वाचविणे शक्य होईल, अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे. त्यामुळे नीरा नदीतून पाणी सोडण्याचा निर्णय तातडीने घेण्याची मागणी जोर धरत आहे. नीरा नदीतून पाण्याचा विसर्ग करून पूर्व भागातील बंधारे भरण्यासाठी संबंधित जलसंपदा विभागाने तातडीने नियोजन करावे. लुमेवाडी बंधाऱ्यासह बिजवडी, तांबवे, ओझरे, गणेशगाव आणि संगम परिसरातील जलसाठ्यांना प्राधान्य द्यावे.

पाणी सोडण्याचे निश्चित वेळापत्रक जाहीर करून प्रत्यक्ष पाणी उपलब्ध करून द्यावे, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. एकीकडे पिके जळत आहेत, तर दुसरीकडे प्रशासनाकडून पाणी उपलब्ध होण्याची प्रतीक्षा करावी लागत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. पिकांचे नुकसान होण्यापूर्वीच नीरा नदीत पाणी सोडून बंधारे भरून द्यावेत, अन्यथा शेतकऱ्यांना आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल, अशी भूमिका परिसरातील शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे. शेतकऱ्यांच्या कष्टाने उभ्या राहिलेल्या पिकांना पाण्याचा आधार मिळणे ही काळाची गरज आहे. त्यामुळे शासन, प्रशासन आणि जलसंपदा विभागाने या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने निर्णय घ्यावा, अशी पूर्व माळशिरस भागातील शेतकऱ्यांची अपेक्षा आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.