

पंढरपूर : बैलपोळा सण अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपला आहे. पंढरपूर तालुक्यातील शेतकरी जनावरांसाठी लागणाऱ्या साहित्यांची खरेदी करण्यासाठी पंढरपूर शहरासह ग्रामीण भागातील दुकाने व स्टॉल सजले आहेत. मात्र दुष्काळाच्या सावटाखाली असलेल्या शेतकऱ्यांचा खरेदीसाठी अपेक्षित प्रतिसाद नाही. त्यामुळे दुकानदारांसह शेतकरी चिंतेत आहेत.
यंदा पावसाअभावी खरीप हंगाम संकटात सापडला आहे. केळी, बेदाणा डाळिंबाच्या दरातील चढ-उतारामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. साखर कारखान्याकडून पोळ्याच्या हप्ता सोडा, मागील हंगामात गाळप झालेल्या उसाचे पैसे देणे बाकी आहेत. त्यातच बैलांसह जनावरांना लागणाऱ्या साहित्यांच्या दरात तब्बल ३० टक्क्यांनी वाढ झाल्याने पोळा साजरा करताना शेतकऱ्यांच्या खिशाला आर्थिक झळ बसत आहे. त्यामुळे साहित्य खरेदी करताना शेतकऱ्यांकडून काटकसर सुरू असून बैलपोळ्यावर दुष्काळाचे सावट आहेत.
पंढरपूर शहरातील नवीपेठ परिसरासह, भादुले चौक, बुरुडगल्ली आणि तालुक्यातील मोठ्या गावांमध्ये बैल व इतर जनावरांना वर्षभर लागणाऱ्या साहित्यांची दुकाने व स्टॉल थाटण्यात आले आहेत. प्रत्येक वर्षीप्रमाणे मोठी उलाढाल होईल, असा व्यापाऱ्यांचा अंदाज होता. मात्र, दोन दिवसांवर पोळ्याचा सण आला तरी शेतकऱ्यांचा प्रतिसाद दिसत नसल्यामुळे शेतकऱ्यानंतर व्यापारीही चिंतेत आहेत. गुरुवार, बैलपोळा सण साजरा होत असल्याने येत्या दोन दिवसांत पशुपालक, शेतकरी बैलांसह जनावरांसाठी लागणारे साहित्य खरेदी करण्यासाठी गर्दी करतील, असा अंदाज आहे.
गेल्या तीन महिन्यांपासून पावसाने ओढ दिल्याने खरीप हंगामातील बाजरीसह अन्य पिके संकटात आहेत. केळी, बेदाणा, डाळिंबाला अपेक्षित दर मिळत नसल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक बजेट विस्कळीत झाले आहे. पाण्याअभावी उसाचे प्लॉट उद्ध्वस्त होत आहेत. साखर कारखान्याकडून थकीत रकमा मिळत नाहीत. पावसाने आणखी ओढ दिल्यास आगामी रब्बी हंगामावरही दुष्काळाचे सावट निर्माण होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत जनावरांच्या साहित्यांच्या वाढलेल्या दरामुळे शेतकऱ्यांवरील आर्थिक भार वाढला आहे.