

सोलापूर : पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील नालेसफाई, ड्रेनेज लाईन आणि नागरी सुविधांच्या कामांचा आढावा घेण्यासाठी महानगरपालिका आयुक्त डॉ.सचिन ओम्बासे यांनी पाहणी केली. या दौऱ्यात त्यांनी प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी जाऊन तांत्रिक सूचना दिल्या तसेच नागरिकांच्या समस्या जागेवरच जाणून घेतल्या. विजापूर रोडवरील बेकायदा नर्सरीला नोटीस देऊन हटवण्याचे आदेश दिले.
जुळे सोलापूर येथील म्हाडा कॉलनी ते पनाश अपार्टमेंट दरम्यान टाकण्यात येणाऱ्या ड्रेनेज पाईपलाईनची आयुक्तांनी पाहणी केली. पाईपलाईन सलग न टाकता ठराविक अंतरावर मॅनहोल (चेंबर) तयार करण्याचे आदेश दिले.
प्रकल्पाच्या जागेतील अनधिकृत नर्सरींना तात्काळ नोटीस बजावण्याचे निर्देश देण्यात आले. नगरसेविका वनिता पाटील यांनी उपस्थित केलेल्या पाणीपुरवठ्याच्या प्रश्नावर रात्री 9 ते 12 ही पाणी सोडण्याची सुधारित वेळ करू, असे आयुक्तांनी सांगितले. या दौऱ्यावेळी उपमहापौर देवकर यांच्या विनंतीनुसार देशी वृक्ष लागवडीच्या सूचनाही देण्यात आल्या. त्यानंतर इंदिरा नगर ते एस.टी. बस स्थानक क्र. 2 पर्यंतच्या नाला सफाईचा आढावा घेताना आयुक्तांनी स्वच्छतेबाबत कडक सूचना दिल्या. व जवळील मनपा मराठी शाळा क्र. 5 ला भेट देऊन आयुक्तांनी विद्यार्थ्यांशी संवाद शैक्षणिक दर्जाची पडताळणी केली.
या दौऱ्यावेळी अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, सभागृह नेते नरेंद्र काळे, नगरसेविका मंदाकिनी तोडकर, विभागीय अधिकारी सुनिता हिबारे, सहाय्यक अभियंता शाम कन्ना व इतर अभियंता उपस्थित होते.