

सोलापूर : सोलापुरातील डीजे मालक व चालकांनी आडमुठी भूमिका घेत डीजे बंदीला विरोध सुरू केला आहे. डीजे बंदी झाल्यास आमच्या व्यवसायावर गदा येणार असल्याचे सांगत कोणत्याही सेवा न देण्याची शपथ त्यांनी घेतली. उत्सवात विघ्न आणण्याचा प्रयत्न करीत त्यांनी गुरुवारी येथील विख्यात श्री आजोबा गणपतीसमोरील लाईट काढण्याचा प्रयत्न केला. पण, त्या ठिकाणी जेलरोड पोलिस ठाण्याचे पथक आल्याने त्यांचा प्रयत्न फसला.
दै. ‘पुढारी’ने सोलापुरात डीजे विरोधी भूमिका घेत जनमानसात प्रबोधन केले. यामुळे डीजेविरोधी चळवळ आक्रमक झाली. सोलापुरात 100 टक्के डीजे बंदीसाठी जनजागृती होत आहे. याला डीजे मालक व चालकांनी दंडेलशाहीने विरोध सुरू केला आहे. सोलापूर शहर जिल्हा लाईट साऊंड असोसिएशनच्या वतीने गुरुवारी (दि.28) सकाळी वालचंद कॉलेज जवळील श्रीकृष्ण मंगल कार्यालय येथील बैठकीत सुमारे 400 डीजे मालक, चालक उपस्थित होते.
यात सोलापुरातील डीजे विरोधी चळवळीबाबत तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त करण्यात आली. डीजे बंदी झाली तर आपल्या व्यवसायावर गदा येणार असल्याचे सांगत अनेकांनी याला विरोध केला. त्यानंतर सर्वांनी शहर जिल्ह्यात डीजे, साऊंड, लाईट यासह जनरेटरही भाड्याने देणार नसल्याची शपथ घेतली. सार्वजनिक, सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, खासगी कार्यक्रमाला कोणत्याही सेवा देणार नसल्याचा निर्णय डीजे मालक व चालकांनी घेतला.