Solapur Diwali festival : दीपोत्सवाचा आनंद लक्ष्मीपूजनाने द्विगुणित

धार्मिक वातावरण, फटाक्यांची आतषबाजी
Solapur Diwali festival
सोलापूर : मोदी परिसरातील चिंतलवार वस्ती येथे तेलगू समाज सेवा संघाच्या वतीने सार्वजनिक लक्ष्मीपूजन उत्साहात पार पडले. दुसऱ्या छायाचित्रात शहरात आतषबाजी करण्यात आली.
Published on: 
Updated on: 

सोलापूर : सोलापुरात दीपावलीनिमित्त अत्यंत भक्तिमय वातावरणात लक्ष्मीपूजन साजरे करण्यात आले. घरगुती आणि व्यापारी वर्गात माता लक्ष्मीचे पूजन करून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. यंदा नरकचतुर्दशी आणि लक्ष्मीपूजन एकाच दिवशी आल्याने दीपोत्सवाचा आनंद आणखी द्विगुणित झाला. दुपारपासून या पूजेसाठी लगबग सुरू असल्याचे दिसून आले. सायंकाळी दिवाळीचे मुख्य लक्ष्मीपूजन मोठ्या उत्साहात आणि मांगल्याच्या वातावरणात पार पडले.

सोलापुरातील बाजारपेठांमध्ये लक्ष्मीपूजनाच्या साहित्यासाठी जसे की लाह्या-बताशे, झेंडूची फुले, केरसुणी, नारळ आणि फळे घेण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी दिसून आली. प्रदोष काळ व लक्ष्मीपूजन मुहूर्त संध्याकाळी ६.२४ ते रात्री ८.२४ दरम्यान पूजेचा सर्वात शुभ काळ होता. यादरम्यान अनेक व्यापाऱ्यांनी वही पूजन केले. बाळगोपाळांनी फटाके फोडून जल्लोष केला.

मोदी परिसरातील चिंतलवार वस्ती येथे तेलगू समाज सेवा संघाच्या वतीने सार्वजनिक लक्ष्मीपूजन उत्साहात पार पडले. रेवणसिद्ध विटेकर महाराज यांच्या मंत्रोच्चारात धार्मिक विधी करण्यात आले. यंदा या सार्वजनिक लक्ष्मीपूजनाचे ८९ वे वर्ष आहे, अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष अंबादास मच्छल यांनी दिली. या पूजेसाठी खासदार डॉ. ज्योती वाघमारे, आमदार देवेंद्र कोठे, नगरसेविका कल्पना कदम, श्वेता खरात, निर्मला जंगम, नरसिंग असादे यांच्यासह भाविकांची लक्षणीय उपस्थिती होती.

कै. सुंदरलाल कमलापूर, इरप्पा म्हेत्रे, बसप्पा संगेपाग आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सर्व समाजांतील नागरिकांना एकत्र आणून या सार्वजनिक पूजेची स्थापना केली. तेव्हापासून ही परंपरा अखंड सुरू आहे. यानिमित्त पाच दिवस विविध धार्मिक व सामाजिक उपक्रमांचे आयोजन केले जाते. यामध्ये रांगोळी स्पर्धा, नृत्य स्पर्धा, फराळ आणि महाप्रसादाचे आयोजन करण्यात येते.

महाराष्ट्रात अशा प्रकारचे सार्वजनिक लक्ष्मीपूजन याच ठिकाणी होत असल्याचे संतोष कदम यांनी सांगितले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी उपाध्यक्ष अनिल विटेकर, सुचित उपलाकर, खजिनदार राम गुदपे, सुमित बावडेकर यांच्यासह मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.