Solapur Water Supply : जिल्ह्यातील एक लाख ९५ हजार पशुधनास टँकरने पाणी

१० तालुक्यांमधील १९८ गावांना आणि ९५७ वाड्यांना २२९ टँकरद्वारे पाणीपुरवठा
Solapur Water Supply
Solapur Water Supply
Published on: 
Updated on: 

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात पाणीटंचाईची तीव्रता वाढत असून ग्रामीण भागातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी टँकरवर अवलंबून राहावे लागत आहे. जिल्ह्यातील १० तालुक्यांमधील १९८ गावांना आणि ९५७ वाड्यांना २२९ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. या माध्यमातून ३ लाख ९९ हजार ९३५ नागरिकांची तहान भागविली जात असून १ लाख ९५ हजार २९७ पशुधनालाही पाणी उपलब्ध करून दिले जात आहे.

जिल्हा प्रशासनाच्या १६ नोव्हेंबर २०२६ रोजीच्या टंचाई अहवालानुसार, जिल्ह्यातील टंचाईग्रस्त भागांसाठी ५० विहिरी आणि ३२ बोअरवेल असे एकूण ८२ जलस्रोत अधिग्रहित करण्यात आले आहेत. जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता व्ही. डी. राठोड यांनी ही माहिती दिली.

जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला असून टँकरच्या फेऱ्यांवरच नागरिकांची दैनंदिन पाण्याची गरज अवलंबून आहे. पाणीटंचाई निवारण्यासाठी प्रशासनाकडून टँकरद्वारे नियमित पाणीपुरवठा केला जात असल्याचे सांगण्यात आले आहे.

मंगळवेढा, सांगोल्यात सर्वाधिक टँकर

तालुकानिहाय परिस्थिती पाहता मंगळवेढा तालुक्यात सर्वाधिक ४५ गावांना ५८ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. सांगोला तालुक्यात ३९ गावांसाठी ५५ टँकर सुरू आहेत. अक्कलकोटमध्ये २७ गावांना १७, माढ्यात १६ गावांना २२, बार्शीत १७ गावांना ७, तर करमाळ्यात १६ गावांना १५ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. माळशिरस तालुक्यात ११ गावांसाठी ११, उत्तर सोलापूरमध्ये ९ गावांसाठी १६, दक्षिण सोलापूरमध्ये ७ गावांसाठी १०, मोहोळमध्ये १० गावांसाठी १७, तर पंढरपूर तालुक्यात एका गावासाठी एक टँकर सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.