

सोलापूर : पावसाळा संपत आला आहे. तरीही अद्याप समाधानकारक पाऊस न पडल्यामुळे जिल्ह्यावर पाणीटंचाईचे सावट अधिकच गडद झाले आहे. जिल्ह्यात पिण्याच्या पाण्याची टंचाई दूर करण्यासाठी प्रशासनाकडून सध्या ७७ टँकरद्वारे ८७ गावे आणि ४३७ वाड्यातील एक लाख ७० म्हणजेच सुमारे पावणेदाेन लाख लोकांना पाणीपुरवठा करण्यात येत आहे.
जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या अहवालानुसार जिल्ह्यात गेल्या आठवड्यात टँकरची संख्या ६३ होती, ती वाढून आता ७७ वर पोहोचली आहे. तालुक्यातील परिस्थिती पाहिली असता, सर्वाधिक टँकर सांगोला (२४ टँकर), मंगळवेढा (१७ टँकर), माढा (१३ टँकर) आणि करमाळा (८ टँकर) या तालुक्यांमध्ये सुरू आहेत. ही संख्या येत्या काळात आणखी वाढण्याची शक्यता ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने वर्तवली आहे.
टंचाई निवारणसाठी ३० विहिरी, १२ बोअरवेलचे अधिग्रहण
टंचाई निवारणासाठी जिल्ह्यात ३० विहिरी आणि १२ बोअरवेलचे अधिग्रहण करण्यात आले आहे. पावसाने दिलेली ओढ, विहिरींची घसरलेली पाण्याची पातळी यामुळे आगामी काळात टँकरची मागणी आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
४६ हजार पशूधनांसाठी होतोय टँकरने पाणीपुरवठा
जिल्ह्यातील ४६ हजार ४८३ पशुधनाला टँकरच्या पाणीपुरवठ्यावर अवलंबून राहावे लागत आहे. दिवसेंदिवस टँकरची संख्या वाढत असल्याने जिल्ह्यातील दुष्काळाची दाहकता अधिकच तीव्र होत असल्याचे चित्र आहे.
सांगोला : २४ टँकरद्वारे १९ गावे व १९६ वाड्यांमधील ४३,२४९ नागरिकांना पाणीपुरवठा
मंगळवेढा : १७ टँकरद्वारे १५ गावे व १३८ वाड्यांमधील ३३,८०९ नागरिकांना पाणीपुरवठा
माढा : १३ टँकरद्वारे १३ गावे व दोन वाड्यांमधील २१,३२९ नागरिक पाणीपुरवठा
करमाळा : आठ टँकरद्वारे ११ गावे व ६१ वाड्यांमधील १८,९७० नागरिकांना पाणीपुरवठा
माळशिरस : चार टँकरद्वारे चार गावे व ४० वाड्यांमधील ७,६५२ नागरिक पाणी
उत्तर सोलापूर : सात टँकरद्वारे पाच गावांमधील १७,४२७ नागरिकांना पाणीपुरवठा
बार्शी : दोन टँकरद्वारे १३ गावांमधील २३,४२३ नागरिक पाणी
अक्कलकोट व दक्षिण सोलापूर : प्रत्येकी एक टँकर सुरू