

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात तीन विविध घटनांत पाच जणांचा खून झाल्याने जिल्हा हादरला आहे. बोरामणी येथे तिहेरी हत्याकांड घडले असून वैराग येथे तीस वर्षीय युवकाचा डोक्यात दगड मारून खून करण्यात आला आहे. तर उळे येथे धारदार शस्त्राने एका चोपन्नवर्षीय इसमाचा खून झाला आहे. एकूण पाच खूनांच्या घटनांनी जिल्हा सुन्न झाला आहे.
सोलापूर: सोलापूर शहरालगतच्या दक्षिण सोलापूर तालुक्यातील बोरामणी गावात घडलेल्या तिहेरी हत्याकांडाने संपूर्ण जिल्हा हादरला. संपत्तीच्या वादातून मोठ्या भावाने विधवा भावजय, पुतणी आणि पुतण्याचा तलवारीने सपासप वार करत जीव घेतल्याची संतापजनक घटना घडली आहे. याबाबत शनिवारी रात्रीउशीरापर्यंत पोलिसात अधिकृत गुन्हा दाखल झाला नव्हता. गायत्री सुधाकर मस्के (वय 45), मुलगी प्रिया मस्के (वय 18) आणि मुलगा शिवराज मस्के (वय 16) अशी हत्या झालेल्यांची नावे आहेत.
काही दिवसांपासून संपत्तीच्या वाटणीवरून त्यांचे दिरासोबत वाद होत होते. संशयित आरोपी शंकर ऊर्फ पप्पू मस्के हा मध्यरात्री घरातून हातात तलवार घेऊन गच्चीवर गेला. त्यावेळी मयत तिघे गच्चीवर झोपले होते. तेथे गेल्यावर संशयिताने प्रथम भावजय गायत्री यांच्यावर तलवारीने सपासप वार केल्याचे समोर येत आहे.
कासेगाव : दक्षिण सोलापूर तालुक्यातील उळे (शिवाजीनगर) येथे 1 मे रोजी पहाटे घडलेल्या संशयास्पद मृत्यू प्रकरणाचा पोलिसांनी अवघ्या 12 तासांत छडा लावत संशयित आरोपीला अटक केली आहे. संजय ऊर्फ आच्छन विठ्ठल शिंदे (वय 54, रा. शिवाजीनगर, उळे) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.
ते घराबाहेर झोपले असताना पहाटे त्यांचा मृतदेह आढळून आला होता. मानेजवळ जखम आढळल्याने सुरुवातीला हा मृत्यू संशयास्पद असल्याची नोंद पोलिसांनी घेतली होती. तो खून असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी अतुल बब्रुवान शिंदे (वय 27, रा. उळे) याला अटक केली आहे. आरोपीचा त्या दिवशी हॉटेलमध्ये मित्रांसोबत वाद झाला होता. त्यानंतर तो गावात येऊन बसला असताना, त्याच्याजवळ झोपलेल्या संजय शिंदे यांनी ‘इथे का बसला आहेस, घरी जा’ असे सांगितल्याने त्या दोघांमध्ये वादावादी झाली. या वादातून संतापलेल्या आरोपीने हातातील चाकूने संजय शिंदे यांच्या गळ्यावर वार केला व त्याने घटनास्थळावरून पळ काढला. या घटनेत शिंदे यांचा जागीच मृत्यू झाला. संजय शिंदे यांच्या पश्चात आई, पत्नी, विवाहित मुलगी, मुलगा, सून व नातवंडे असा परिवार आहे.
वैराग : बार्शी तालुक्यातील वैैराग येथील दत्तनगर भागात शनिवारी पहाटे दगडाने ठेचून एका तीस वर्षीय युवकाचा खून झाल्याची घटना उघडकीस आली. त्यामुळे वैराग व परिसरामध्ये खळबळ उडाली आहे. दिनेश कापसे (वय 30, रा. दत्तनगर, वैराग) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. सदर घटनेची माहिती मिळताच वैराग पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक कुंदन गावडे यांनी आपल्या टीमसह घटनास्थळी धाव घेतली.