

सोलापूर : परफॉर्मन्स ग्रेडिंग इंडेक्स मूल्यांकन व्यवस्थेकडून राज्यातील सर्व जिल्ह्यांची सन 2023-24 मधील शैक्षणिक गुणवत्तेची तपासणी केली आहे. त्यामध्ये सोलापूर जिल्ह्याचा राज्यात तिसरा क्रमांक आला. प्रधान सचिव रणजितसिंह देओल, शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रतापसिंह, प्राथमिक संचालक शरद गोसावी यांच्या हस्ते प्राथमिक शिक्षणाधिकारी कादर शेख यांचा छत्रपती संभाजीनगर येथे सत्कार करण्यात आला आहे.
भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयच्या वतीने पीजीआय म्हणजेच परफॉर्मन्स ग्रेडिंग इंडेक्स तर्फे राज्यातील 36 जिल्ह्याची शैक्षणिक गुणवत्ता तपासणी करण्यात आली आहे. त्यामध्ये सोलापूर जिल्ह्याचा तिसरा क्रमांक आला आहे. पीजीआयकडून राज्यातील सर्व जिल्ह्यात शिक्षणाची गुणवत्ता, विद्यार्थ्यांची परीक्षेतील कामगिरीचे चाचण्यातून मूल्यमापन, विद्यार्थ्यांची उपस्थिती, मागासवर्गीय विद्यार्थ्यांचा समावेश, शाळेतील स्वच्छतागृह, पिण्याचे पाणी, वीज, संगणक, डिजिटल सुविधा, शिक्षकांची अध्यापन प्रक्रिया, शिक्षकांची संख्या, प्रशिक्षण, शाळा निरीक्षण, शालेय व्यवस्थापन कार्यक्षमतेसह इतर सर्व गोष्टींची तपासणी करून जिल्ह्यास गुण देण्यात आले आहे.