Solapur District Bank Election : दिग्गज नेत्यांचे अर्ज अपात्र अन्‌ पुत्र, पुतणे मैदानात

छाननीत उलटफेर; मोहिते-पाटील, शिंदे, माने, पाटील व परिचारक, जगतापांचे वारसदार मैदानात
Solapur District Bank
Solapur District Bank
Published on: 
Updated on: 
अमोल साळुंके

सोलापूर : जिल्‍हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्‍या अर्ज छाननीत अनेक दिग्गज नेत्‍यांचे अर्ज बाद झाले असून, त्‍यांचे पुत्र, पुतणे आता निवडणुकीच्‍या मैदानात उतरल्‍याचे चित्र दिसत आहे.

सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या रणसंग्रामात उमेदवारी अर्जांच्या छाननीनंतर राजकीय पटलावर मोठे उलटफेर पाहायला मिळाले. सहकार आणि राजकारणातील अनेक दिग्गज नेत्यांचे अर्ज तांत्रिक कारणांमुळे बाद झाले असले, तरी त्यांनी आपल्या पुढच्या पिढीला मैदानात उतरवून वर्चस्व कायम ठेवले आहे. त्यामुळे यंदाची डीसीसी बँकेची निवडणूक म्हणजे ज्येष्ठांचे पडद्यामागील मार्गदर्शन आणि युवा नेत्यांची प्रत्यक्ष लढाई अशीच रंगण्याची चिन्हे दिसत आहेत.

​अर्ज छाननी निकालातील सर्वाधिक लक्षवेधी आणि धक्कादायक बाब म्हणजे माजी आ. रणजितसिंह मोहिते-पाटील यांचा अर्ज बाद झाला आहे. मात्र, त्यांचे बंधू तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार गट) खा. धैर्यशील मोहिते-पाटील, अर्जुनसिंह मोहिते-पाटील यांचा अर्ज मंजूर झाल्याने मोहिते-पाटील गटाचा मार्ग सुकर झाला आहे. अर्ज बाद झाल्यानंतर आता मोहिते-पाटील गट कोणती नवी रणनीती आखणार, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे बारकाईने लक्ष लागले आहे.

प्रमुख नेत्यांचे अर्ज बाद झाले असले तरी सोलापूर जिल्ह्यातील प्रस्थापित राजकीय घराण्यांनी आपली पकड सैल होऊ दिलेली नाही. आपल्या कुटुंबाचे बँकेतील अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी पुढील पिढीला ताकदीने निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात आले असून, त्‍यांच्‍याकडे जिल्‍ह्याचे लक्ष लागले आहे.

हे नवे चेहरे डीसीसीच्‍या मैदानात

प्रमुख नेत्‍यांचा अर्ज बाद झाला असला तरी आता त्‍या नेत्‍यांचे पुत्र, पुतण्या डीसीसी निवडणुकीच्‍या मैदानात आहेत. यामध्ये पृथ्वीराज माने, श्रीदीप हसापुरे, शंभूराजे जगताप, बाळराजे पाटील, उमेश परिचारक, प्रणव परिचारक, सिद्धेश्वर आवताडे, अर्जुनसिंह मोहिते-पाटील आणि यशवंत शिंदे यांचा समावेश आहे.

​पुढील पिढीचा प्रभाव कितपत पडणार

​माजी आ. संजयमामा शिंदे, दिलीप माने, राजन पाटील, प्रशांत परिचारक, जयवंतराव जगताप आणि सुरेश हसापुरे यांच्‍या कुटुंबातील नवी पिढी बँकेच्या राजकारणात कितपत प्रभाव दाखवते आणि ज्येष्ठ नेत्यांचा वारसा कसा पुढे चालवते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

निवडणूक लागणार की बिनविरोध

​एकीकडे डीसीसी बँक बिनविरोध करण्याचे प्रयत्न पडद्यामागून सुरू असल्याच्या चर्चा आहेत, तर दुसरीकडे दिग्गज बाद झाल्याने युवा नेत्यांमध्ये जोरदार ईर्ष्या निर्माण झाली आहे. येत्या काही दिवसांच्या अर्ज माघारी घेण्यात येणार आहे. त्‍यात नेमक्या कोणत्या घडामोडी घडतात आणि बँकेची निवडणूक लागणार की बिनविरोध होणार याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.