सोलापूर : सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (डीसीसी) निवडणुकीसाठी गुरुवारी (दि.२६) मतदानाचा ज्वर शिगेला पोहोचला असतानाच, मतदान केंद्रावर अस्सल सोलापुरी राजकारणाचा दिलखुलास अंदाज पाहायला मिळाला. निवडणुकीच्या आखाड्यात एकमेकांविरोधात दंड थोपटणारे दिग्गज नेते प्रत्यक्ष भेटीत मात्र राजकीय मतभेद विसरून गप्पांच्या मैफलीत रंगले. आ. सुभाष देशमुख यांनी शिवसेनेचे उमेदवार तथा नगरसेवक अमोल शिंदे यांच्या खांद्यावर हात टाकत साधलेला जिव्हाळ्याचा संवाद आणि आ. विजयकुमार देशमुख यांची दोन्ही पार्ट्या आमच्याच, ही मिश्किल टिप्पणी संपूर्ण जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरले.
जिल्हा बँकेच्या निवडणुकीत भाजपप्रणीत सहकार विकास पॅनेलने यापूर्वीच १० जागा बिनविरोध जिंकल्या असून, उर्वरित नऊ जागांसाठी गुरुवारी मतदान पार पडले. यामध्ये नागरी बँका व पतसंस्था मतदारसंघातील भाजपचे मनीष देशमुख आणि शिवसेनेचे अमोल शिंदे यांच्यातील प्रतिष्ठेच्या लढतीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले होते. मात्र, दोन्ही उमेदवार फडकुले सभागृहातील मतदान केंद्रावर एकमेकांच्या हातात हात देऊन दिलखुलास गप्पा मारल्याचे चित्र पाहायला मिळाले.
आ. देशमुखांचा शिंदेंच्या खांद्यावर हात...
निर्मलकुमार फडकुले सभागृहात मतदानाची प्रक्रिया सुरू असताना अनेक दिग्गजांनी हजेरी लावली. आ. सुभाष देशमुख, माजी आ. दिलीप माने यांच्यासह प्रतिस्पर्धी उमेदवार मनीष देशमुख आणि अमोल शिंदे यांनी येथे मतदानाचा हक्क बजावला. यावेळी आ. सुभाष देशमुख यांनी अमोल शिंदे यांना जवळ घेत त्यांच्या खांद्यावर हात टाकून संवाद साधला. एकीकडे देशमुख विरुद्ध शिंदे अशी अटीतटीची लढत रंगली असताना, बापूंच्या या अनपेक्षित जिव्हाळ्याने उपस्थितांच्या भुवया उंचावल्या. बापूंनी अमोल बापूंना नेमका काय कानमंत्र दिला, याबाबत राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आले आहे.
विजय मालकांची मार्मिक गुगली
मतदान केंद्रावर नेत्यांच्या भेटीगाठी सुरू असतानाच, आ. विजयकुमार देशमुख यांनी मतदानाचा हक्क बजावल्यानंतर आपल्या खास शैलीत दोन्ही पार्ट्या आमच्याच! अशी मिश्किल टिप्पणी केली. निवडणुकीच्या मैदानात राजकीय भूमिका वेगळ्या असल्या तरी मैत्रीच्या नात्यात कटुता नसते, हाच संदेश त्यांच्या या मार्मिक विधानातून अधोरेखित झाला.
आम्ही भांडणारे लोक नाही
फडकुले मतदान केंद्रावर नेत्यांची गप्पांची रंगली मैफल रंगली होती. उमेदवार मनीष देशमुख आणि अमोल शिंदे मतदान केंद्रावर बराच वेळ ठाण मांडून होते. यावेळी काँग्रेसचे नगरसेवक चेतन नरोटे, भाजप शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर, उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, दिलीप पतंगे, श्रीशैल बनशेट्टी आदी नेते एकाच ठिकाणी आले. निवडणूक बाजूला ठेवून या सर्वच नेत्यांनी एकमेकांशी मनमोकळ्या गप्पा मारल्या. याप्रसंगी रोहिणी तडवळकर यांनी, आम्ही भांडणारे लोक नाही; राजकारणाच्या ठिकाणी राजकारण, बाकी मैत्री आणि स्नेह कायम, अशी मिश्किल टिप्पणी करताच सर्वत्र एकच हशा पिकला.