Solapur District Bank Election : जिल्‍हा बँकेवर भाजपची एकहाती सत्ता

पालकमंत्र्यांची रणनीती यशस्‍वी; १९ पैकी १८ जागेवर विजय
Solapur District Bank Election : जिल्‍हा बँकेवर भाजपची एकहाती सत्ता
Published on: 
Updated on: 

सोलापूर : सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत पालकमंत्री जयकुमार गोरे यांची रणनीती यशस्‍वी ठरल्याने भाजपने संचालकपदाच्या १९ पैकी १८ जागांवर विजय मिळवून बँकेवर एकहाती सत्ता मिळविली. या विजयानंतर कार्यकर्त्यांनी गुलाल उधळत जल्लोष केला.

जिल्‍हा बँकेच्या निवडणुकीत भाजप पुरस्कृत समविचारी सहकार पॅनेलने १९ पैकी १८ जागांवर वर्चस्‍व मिळविले. यापूर्वी १० जागांवर भाजप पुरस्कृत उमेदवार बिनविरोध निवडून आले होते. उर्वरित नऊ जागांसाठी शुक्रवारी (दि.२७) झालेल्या मतमोजणीत भाजप पुरस्कृत पॅनेलने आठ जागांवर विजय मिळवत जिल्‍हा बँकेवर एकहाती सत्ता प्रस्‍थापित केली. मोहिते-पाटील गटाला एका जागेवर समाधान मानावे लागले.

जिल्हा बँकेच्या निवडणुकीत भाजप विरुद्ध मोहिते-पाटील अशी राजकीय प्रतिष्ठेची लढत रंगली होती. मात्र, मोहिते-पाटील गटाचे अर्जुनसिंह मोहिते-पाटील यांनी विविध कार्यकारी सोसायटी मतदारसंघात विजय मिळवत गटाचे खाते उघडले; परंतु इतर एकाही उमेदवाराला विजय मिळविता आला नाही. त्‍यामुळे भाजपची बँकेवर एकहाती सत्ता आली आहे.

मतमोजणी केंद्रावर गोंधळ

डॉ. अनिकेत देशमुख यांनी मतपत्रिका चुरगळल्याचा आक्षेप घेतल्याने मतदान केंद्रावर काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. मात्र, निवडणूक निर्णय अधिकारी मुकुंद पवार यांनी मतपत्रिका कमी असू शकतात. मात्र, त्‍या जास्‍त झाल्‍यास आक्षेप घेणे योग्य राहील. एखादा मतदार एका उमेदवारास मतदान न केल्‍यास मतपत्रिका कमी होऊ शकते, असा खुलासा केल्‍यानंतर डॉ. देशमुख शांत झाले. त्‍यामुळे मतदान केंद्रावरील गोंधळ थांबला.

पालकमंत्र्यांचे रामबाण औषध लागू

जिल्‍हा बँकेच्‍या निवडणुकीत भाजपच्‍या काही उमेदवारांना फटका बसणार अशी चर्चा होती. मात्र, निवडणुकीत कोणीही गमती-जमती करू नका. केलंच तर त्याचं औषध माझ्याकडे आहे. त्यामुळे चिंता नाही, असा इशारा पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी निवडणुकीच्‍या दोन दिवस अगोदर दिला होता. त्याचा तो रामबाण ठरला. त्यामुळे एकाही नेत्याने पक्षांतर्गत विरोधकाचा काटा काढण्याचे या निवडणुकीत धाडस केले नाही. त्यामुळे पालकमंत्र्यांची या निवडणुकीची रणनीती यशस्वी ठरली.

निवडणुकीतील क्षणचित्रे

मनीष देशमुख यांना बालेकिल्‍ल्यातच दणका

नऊपैकी आठ जागांवर भाजपचे उमेदवार विजयी

एकमेव विरोधक अर्जुनसिंह मोहिते-पाटील ५० मतांनी विजयी

स्‍वाभिमानीचे उमेदवार, नगरसेवक अमोल शिंदे यांची कडवी झुंज

आ. बाबासाहेब देशमुख यांचा सांगोल्यात विजय

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.