Solapur District Bank Election : जिल्‍हा बँक निवडणुकीत प्रस्थापितांना धक्का

मोहिते-पाटील, शिंदे, माने, परिचारक, म्‍हेत्रे, पाटील, हसापुरेंचे अर्ज अपात्र; निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचा निकाल
Solapur District Bank
Solapur District Bank
Published on: 
Updated on: 

सोलापूर : सोलापूर जिल्‍हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. त्‍यात माजी संचालकांच्या उमेदवारी अर्जावर हरकती घेण्यात आल्‍या होत्‍या. त्‍याचा निकाल मंगळवारी (दि. ३) देण्यात आला आहे. यामध्ये माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे, माजी आ. रणजितसिंह मोहिते-पाटील, माजी आ. राजन पाटील, माजी आ. जयवंत जगताप, माजी आ. संजयमामा शिंदे, माजी आ. दिलीप माने, माजी आ. प्रशांत परिचारक यांच्यासह श्री सिद्धेश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सुरेश हसापुरे यांच्‍यासह अनेक दिग्गजांचे अर्ज अपात्र झाले. यामुळे प्रस्थापितांना धक्का बसला आहे.

अर्ज अपात्रतेमुळे हे प्रस्थापित निवडणुकीच्या थेट रिंगणात राहणार नसले तरी त्यांनी आपली पुढची पिढी म्हणजे मुले, पुतणे यांचे समांतर अर्ज दाखल करून ठेवले आहेत. ते सर्व पात्र ठरले आहेत. त्यातच खा. धैर्यशील मोहिते-पाटील, आ. सुभाष देशमुख, आ. सचिन कल्याणशेट्टी, आ. समाधान आवताडे, आ. बाबासाहेब देशमुख आणि आ. राजेंद्र राऊत यांचे अर्ज मंजूर झाले आहेत. त्यामुळे बँकेच्या संचालक मंडळावर यंदा जुन्या-नव्या संचालकांचे चित्र दिसू शकते.

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळ निवडणुकीच्या अर्ज छाननीत कलम ८८ अन्‍वये आणि ११० अ अंतर्गत दिग्गज नेत्यांचे उमेदवारी अर्ज अपात्र ठरले. जिल्हा बँकेच्या सभागृहात निवडणूक निर्णय अधिकारी मुकुंद पवार यांच्या उपस्थितीत ही छाननी प्रक्रिया पार पडली.

या नेत्यांचे अर्ज अपात्र

माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे, माजी आ. राजन पाटील, माजी आ. रणजितसिंह मोहिते-पाटील, माजी आ. जयवंत जगताप, माजी आ. संजयमामा शिंदे, माजी आ. दिलीप माने, माजी आ. प्रशांत परिचारक, श्री सिद्धेश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सुरेश हसापुरे, जिल्हा परिषद सदस्या रश्मी बागल आणि ज्येष्ठ नेते बबनराव आवताडे यांचे अर्ज कलम ८८ आणि कलम ११० अ अंतर्गत अपात्र ठरले.

सातपुते, शिंदे, पाटील यांचे अर्ज मंजूर

माजी आ. राम सातपुते, सोलापूर जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष रणजितसिंह शिंदे, शहाजीराजे देशमुख, बाबासाहेब पाटील यांच्या अर्जांवरील हरकती फेटाळण्यात आल्याने या सर्वांचे अर्ज या निवडणुकीसाठी पात्र ठरले.

कलम ८८, ११० अ अंतर्गत अर्ज अपात्र

विशेषतः कलम ८८ अंतर्गत आर्थिक जबाबदारी निश्चिती आणि कलम ११० अ अंतर्गत प्रशासकीय समितीशी संबंधित बाबींमुळे काही उमेदवारांचे अर्ज राखून ठेवले होते. या अर्जांवर सुनावणी झाल्यानंतर अंतिम निर्णय जाहीर करण्यात आला. संबंधित तरतुदींतर्गत हरकती असलेल्या उमेदवारांचे अर्ज अपात्र ठरले.

अर्ज अपात्र ठरलेल्या उमेदवारांना विभागीय सहनिबंधकांकडे अपील करण्याची संधी आहे. त्यामुळे त्यातील काही नेते अपील करणार आहेत.
- ॲड. उमेश मराठे, अर्ज अपात्र ठरलेल्या नेत्यांचे वकील