

सोलापूर : सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी शुक्रवारी महायुती आणि महाविकास आघाडीतील अनेक दिग्गज नेत्यांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. विधान परिषदेचे आ. राजेंद्र राऊत आणि मोहोळचे विक्रांत (बाळराजे) पाटील हे दोघेही आपापल्या विकास सोसायटी मतदार संघातून बिनविरोधच्या मार्गावर आहेत.
आ. राजेंद्र राऊत, आ. बाबासाहेब देशमुख, आ. अभिजित पाटील, माजी आ. रणजितसिंह मोहिते-पाटील, माजी आ. संजयमामा शिंदे, माजी आ. राम सातपुते, माजी संचालक सुरेश हसापुरे यांच्यासह १६९ जणांनी शुक्रवारी (दि. ३०) अर्ज दाखल केले.
निवडणुकीसाठी मागील चार दिवसांत २३८ अर्ज दाखल झाले आहेत. त्या अर्जावर छाननी सोमवारी (दि. २) बँकेच्या सभागृहात होणार असल्याची माहिती निवडणूक प्रमुख तथा जिल्हा उपनिबंधक मुकूंद पवार यांनी दिली.
यांचे अर्ज दाखल
विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेतून आ. राजेंद्र राऊत, संजीव पाटील, सुभाष निंबाळकर, माजी आ. रणजितसिंह मोहिते-पाटील, माजी आ. संजयमामा शिंदे, अर्जुनसिंह मोहिते-पाटील, शहाजीराव देशमुख, संग्रामसिंह जाहागिरदार, भारत शिंदे, संजय कोकाटे, सुशील आवताडे, शैलेंद्र (प्रशांत) परिचारक, उमेश परिचारक, प्रणव परिचारक, आ. बाबासाहेब देशमुख, अतुल पवार, सुरेश हसापुरे, रश्मी बागल, रुपमती दीपकआबा साळुंखे, माजी महापौर शोभा बनशेट्टी.