Dharashiv Silk Cocoon: धाराशिवमधील रेशीम कोषला राज्यात दुसऱ्या क्रमांकाचा दर

सोलापुरातील सेंटरवर लिलावास उत्पादकांचा प्रतिसाद
Silk Cocoon
Silk Cocoon
Published on
Updated on

सोलापूर : सोलापुरातील रेशीम कोष लिलाव सेंटरवर बुधवारी विक्रमी आठ लाख ९१ हजार ७१० रुपयांची उलाढाल झाली. यामध्ये सर्वाधिक विक्रमी म्हणजे ८३० रुपयांचा दर धाराशिव जिल्ह्यातील उत्पादकास मिळाला. हा दर राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचा आहे.

सोलापुरातील रेशीम कोष लिलाव सेंटरवर खामकरवाडी येथील गोकुळ हणमंत सावंत यांच्या रेशीम कोषाला हा उच्चांकी दर मिळाला. माल पांढरा शुभ्र, स्वच्छ आणि स्क्रोल चांगल्या प्रतीचा असल्याने त्यांच्या ९० किलो मालास हा विक्रमी दर मिळाल्याचे रेशीम कोष लिलाव सेंटरचे विभागप्रमुख विनोद पाटील यांनी दै. ‘पुढारी’स सांगितले.

सोलापुरातील हिरज येथील रेशीम भवनामध्ये रेशीम कोशाचे लिलाव होत आहेत. बुधवारी (दि. ५) लिलावात १२ उत्पादकांनी सहभाग नोंदवला. यावेळी एक हजार २५५ किलो रेशीम कोषची विक्री झाली. सोलापूरमध्ये रेशीम कोष लिलाव सेंटर झाल्यामुळे शेतकऱ्यांची मोठी सोय झाली असून, भविष्यात रेशीम उत्पादनाखालील क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढण्यास मदत होणार असल्याची प्रतिक्रिया या सेंटरवर आलेल्या शेतकऱ्यांनी व्यक्त केली. दरम्यान, बीडमधील सेंटरवर सोलापूरपेक्षा दहा रुपये अधिक म्हणजे ८४० रुपये दर मिळाला.

सोलापुरात कर्नाटकसह महाराष्ट्रातून येतात कोष

उत्तर सोलापूर तालुक्यातील हिरज येथील रेशीम भवन येथे कर्नाटकातील काही जिल्ह्यांतून तसेच मराठवाड्यातील धाराशिव, लातूर, पश्चिम महाराष्ट्रातील सांगली, सोलापूर जिल्ह्यांतील उत्पादक रेशीम कोष विक्रीसाठी घेऊन येत आहेत. सांगलीतील व्यापारी राकेश माहेश्वरी हे सोलापूर सेंटरवरून रेशीम कोषची मोठ्या प्रमाणात खरेदी करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news