

सोलापूर : माळशिरस तालुक्यातील जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखेत तारण ठेवलेले सोने नकली निघाले आहे. त्यामुळे चार शाखा अधिकार्यांना निलंबित केल्याचे वृत्त सोशल मिडीयावर फिरत आहे. याविषयी बँकेच्या अधिकार्यांशी संपर्क साधल्यावर त्यांनी याबाबत आम्हाला काही माहीत नसल्याचे सांगितले.
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर प्रशासक असून, कुंदन भोळे काम पाहत आहेत. मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र शिंदे आहेत. शाखा अधिकारी निलंबनाविषयी माहिती घेण्यासाठी संपर्क साधला. त्यावेळी त्यांनी आम्हाला याविषयी काही माहीत नसल्याची माहिती दिली आहे. त्यामुळे सोशल मिडीयावरील निलंबनाचे वृत्त खरे की खोटे हे जिल्हा बँक प्रशासनाच्या पत्रानंतरच कळणार आहे. दरम्यान, माळशिरस तालुक्यातील डीसीडी बँकेच्या काही शाखेत खोट्या सोन्यावर खरे कर्ज दिल्याची माहिती समोर आली आहे. बँकेच्या वरिष्ठ अधिकार्यांनी खातरजमा केल्यानंतर तारण ठेवलेले सोने नकली असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे माळशिरस तालुक्यातील चार शाखा अधिकार्यांना निलंबित केल्याची चर्चा होत आहे.
माळशिरस तालुक्यातील चार शाखा अधिकारी यांच्याकडील पदभार काढून घेऊन त्यांना सोलापूर मुख्यालय येथे चौकशीसाठी बोलविल्याची माहिती समोर आली आहे. या शाखा अधिकार्यांची कसून चौकशी केली जाणार आहे. शाखा अधिकारी दोषी असल्यास त्यांच्यावर प्रशासकीय कारवाई केली जाणार आहे. चार शाखेपैकी एका शाखेचे प्रकरण पोलीस स्टेशनकडे दाखल करण्याच्या हालचाली सुरू आहेत.