

सोलापूर : सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी महायुती झाली तर स्वागतच आहे. मात्र, महायुती झाली नाही तरी भाजप स्वबळावर निवडणूक लढविण्यास सक्षम आहे. त्यासाठी भाजपला कोणाच्याही पुढाकाराची गरज नाही. महायुती न झाल्यास मैत्रीपूर्ण लढत होऊ शकते. तसेच आमदार मोहिते-पाटील यांच्या अविरोध निवडीसाठी पुढाकार घेण्याची आवश्यकता नाही, अशी स्पष्ट भूमिका पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी मांडली.
पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी गुरुवारी जिल्ह्यातील पाणीटंचाईचा आढावा घेतल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीबाबत विचारले असता त्यांनी भाजपची भूमिका स्पष्ट केली. डीसीसी बँकेच्या निवडणुकीत महायुतीच्या माध्यमातून एकत्रित लढण्याचा प्रयत्न राहील. मात्र, जागावाटप करताना प्रत्येक पक्षाची राजकीय ताकद विचारात घेतली जाईल. ज्याची जितकी राजकीय ताकद असेल, त्याप्रमाणे त्याला जागा मिळतील. केवळ महायुतीच्या नावाखाली जागावाटप होणार नाही, असे संकेतही गोरे यांनी दिले.
माजी आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी बँकेची निवडणूक अविरोध करण्यासाठी आता आवाहन केले आहे. मात्र, त्यांना हे शहाणपण उशिरा सुचले आहे, असा टोला पालकमंत्री गोरे यांनी लगावला. मोहिते-पाटील यांच्या अविरोध निवडीसाठी भाजपने पुढाकार घेण्याची आवश्यकता नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. जिल्हा बँकेच्या निवडणुकीत महायुतीतील घटक पक्षांमध्ये जागा वाटपावरून काय भूमिका घेतली जाते, याकडे आता राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. भाजपने स्वबळाचा पर्याय खुला ठेवल्याने निवडणुकीतील राजकीय समीकरणे अधिक रंगण्याची शक्यता आहे.
रोहित पवारांचे आग लावण्याचे काम
आमदार रोहित पवार हे पंढरपूरमध्ये आंदोलन करण्यासाठी आले होते. मात्र, त्यांच्या आंदोलनाला शेतकऱ्यांचा अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. आता उजनी येथील एआय डेटा सेंटर प्रकल्पाबाबत ते चुकीची माहिती देऊन जनतेची दिशाभूल करीत आहेत. विकासकामांमध्ये अडथळे निर्माण करण्याचे काम सुरू आहे, अशी टीका पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केली. हा प्रकल्प गुजरातमध्ये गेला असता, तर तो गुजरातला गेल्याबद्दलही त्यांनीच टीका केली असती. प्रत्येक विषयात आंदोलन करून वातावरण तापविण्याचा त्यांना जणू रोगच लागला आहे. अशा शब्दांत गोरे यांनी रोहित पवारांवर निशाणा साधला.