Jaykumar Gore : ऊस, फळबागांसह अन्य पिकांचे पंचनामे करा

पालकमंत्री जयकुमार गोरे यांचे निर्देश : सांगोला, पंढरपूर तालुक्यांतील गावांत पीक नुकसानीची पाहणी
Jaykumar Gore : ऊस, फळबागांसह अन्य पिकांचे पंचनामे करा
Published on: 
Updated on: 

सोलापूर : दुष्काळामुळे ज्या शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे. त्यांच्या शंभर टक्के क्षेत्राचे सरसकट पंचनामे करावेत. ऊस, फळबागांसह अन्य पिकांच्या नुकसानग्रस्त क्षेत्राचाही पंचनाम्यात समावेश करावा, असे सक्त निर्देश पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत.

दुष्काळी परिस्थितीचा प्रत्यक्ष आढावा घेण्यासाठी पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी रविवारी जिल्ह्यातील विविध दुष्काळग्रस्त भागांना भेट देऊन पिकांच्या नुकसानीची पाहणी केली. यावेळी सांगोला तालुक्यातील कटफळ येथे शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेताना शेतकऱ्यांना शासनाकडून सर्वतोपरी मदत केली जाईल, अशी ग्वाही दिली. तसेच, पंढरपूर तालुक्यातील गुरसाळे येथे पालकमंत्री गोरे यांनी ग्रामस्थांशी संवाद साधला. ग्रामस्थांनी यावेळी आपल्या विविध मागण्या व समस्यांचे निवेदन त्यांना दिले.

सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांना दिलासा देणे, पीक नुकसानीचे अचूक मूल्यांकन करणे आणि ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्याची उपलब्धता निश्चित करणे याला शासनाचे प्राधान्य आहे. त्यामुळे सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने काम करून शेतकरी व नागरिकांना आवश्यक मदत वेळेत उपलब्ध करून द्यावी, असे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले.

यावेळी आ. बाबासाहेब देशमुख, दीपक साळुंखे-पाटील, शहाजी पाटील, प्रशांत परिचारक, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शुक्राचार्य भोसले, प्रांताधिकारी अमित माळी, तहसीलदार बाळुबाई भागवत, तालुका कृषी अधिकारी दीपाली जाधव, गटविकास अधिकारी अमोल जाधव, योगेश कांबळे, पंढरपूरचे प्रांताधिकारी सचिन इथापे, तहसीलदार सचिन लंगुटे यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी आदींसह शेतकरी उपस्थित होते.

गार्डी गावासाठी पाणी सोडण्याचे निर्देश

पंढरपूर तालुक्यातील गार्डी गावाला कासाळ ओढ्यावरील तलावातून पाणीपुरवठा केला जातो. दुष्काळी परिस्थितीत गावाच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी संबंधित तलावात पाणी सोडण्याबाबत पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी जलसंपदा विभागाच्या अधीक्षक अभियंत्यांना आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश दिले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news