

वैराग : गेल्या आठवड्यामध्ये वैराग भागातून ट्रॅक्टर चोरीला जाण्याचे प्रमाण वाढले असून दोन दिवसापूर्वी दोन ट्रॅक्टर चोरीस गेल्याची तक्रार वैराग पोलीस ठाण्यामध्ये दाखल झाली. वैराग पोलिसांनी युद्ध पातळीवर डीबी पथक नेमून तपास केला असता अवघ्या 48 तासात दोन चोरट्यांना जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले आहे.
यामध्ये चोरीस गेलेले दोन ट्रॅक्टर आणि रोटावेटर सह सहा लाख वीस हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.पोलिसांनी केलेल्या या तत्पर कारवाईचे कौतुक सर्वत्र होत आहे. वैराग येथील विक्रांत चंद्रकांत नवले आणि तुषार संतोष बिर्गे यांचे ट्रॅक्टर चोरीस गेले होते. त्यांनी वैराग पोलीस ठाण्यामध्ये तक्रार नोंदवल्यानंतर पोलीस निरीक्षक कुंदन गावडे यांच्या आदेशानुसार वैराग पोलिसांनी पोलीस उपनिरीक्षक प्रतापसिंह जाधव यांच्या नेतृत्वाखाली एक पथक नेमले.
यामध्ये पोलीस हेडकॉन्स्टेबल अमोल भोरे पोलीस कॉन्स्टेबल आकाश पवार, राहुल पाटील, गणेश परजणे, प्रदीप चव्हाण आदी पोलिसांचा समावेश होता यांनी सुमारे 80 किलोमीटर मधील 60 ते 70 सीसीटीव्ही कॅमेरे तपासून चोरांचा मागवा काढला दरम्यान चोरीची लिंक धाराशिव जिल्ह्यातील कसबे तडवळ्यापर्यंत पोहोचली. तेथील सागर शिवाजी मडके आणि कानिफनाथ नानासाहेब बागल यांना संशयावरून पोलिसांनी ताब्यात घेतले असून बार्शी सत्र न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल अमोल भोरे हे करीत आहेत.