

सोलापूर : विजापूर रोडवर शनिवारी (दि.१९) पहाटे दोघांना कोयत्याच्या धाक दाखवून दहाजणांच्या टोळीने लुबाडल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. त्यांच्याकडून रोख रक्कम, तीन तोळे सोन्याचे दागिने, मोबाईल असा दोन लाख ३५ हजार रुपयांचा ऐवज चोरुन नेला. या धाडसी दरोड्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
संजय केरबा भडंगे (वय ४८, रा. आंबेडकर नगर, विजापूर रोड, सोलापूर) हे मित्र विपुल थोरे व मस्के, कोळी यांच्यासोबत शनिवारी पहाटे दोनच्या सुमारास विजापूर रोडवरुन कारमधून येत होते. विजापूर रोडवरील निशा हॉटेलच्या बाजूला मोकळ्या मैदानात ते लघवी करण्यासाठी थांबले. यावेळी पाच दुचाकीवरुन दहा अज्ञात इसम त्यांच्याजवळ आले. त्यांच्यातील काही जणांच्या हाती कोयते होते.
या कोयत्याचा धाक दाखवून त्यांनी संजय यांच्याकडील रोख ८० हजार रुपये, विपुल थोरे याच्या गळ्यातील दीड तोळे सोन्याचे लॉकेट, मस्के याच्या हातातील एक तोळे आणि तीन ग्रॅम सोन्याची अशा दोन अंगठ्या तसेच कोळी याचा मोबाईल फोन असा एकूण दोन लाख ३५ हजार रुपयांचा ऐवज जबरदस्तीने काढून घेतला. यावेळी त्यांनी लाथाबुक्क्यांनी मारहाणही केली.
या घटनेनंतर घाबरलेले चौघे घरी गेले. त्यानंतर दोन दिवसांनी त्यांनी पोलिसात धाव घेतली. संजय भडंगे यांच्या फिर्यादीवरुन दहा अज्ञात चोरट्यां विरोधात लूट, दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास सहा. पोलिस निरीक्षक शीतलकुमार गायकवाड करीत आहेत. गेल्यावर्षी याच ठिकाणच्या परिसरात मित्र-मैत्रिणीला लुबाडून मित्रावर वार केल्याची घटना घडली होती. या गुन्ह्याचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले होते. परंतु त्यानंतर तेथे पुन्हा असाच गुन्हा घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. आरोपींच्या शोधासाठी पोलिसांची पथके रवाना झाली आहेत.