

सोलापूर ः शहरातील लष्कर परिसरात राहणार्या एका तृतीयपंथीयाचा उशी तोंडावर दाबून खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. त्याच्याजवळील सोने, मोबाईल आणि दुचाकी चोरुन नेल्याची प्राथमिक माहिती आहे. आयुब हुसेन सय्यद (वय 50, रा. पिंधारी मस्जिद शेजारी, मुर्गीनाला, लष्कर, सोलापूर) असे खून झालेल्या तृतीयपंथीयाचे नाव आहे.
शनिवारी (दि. 27) दुपारी तीनच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. आयुब याच्या तोंडावर उशी दाबून खून करण्यात आला. त्यानंतर त्याच्या जवळील सोने, मोबाईल व मोटारसायकल घेऊन अनोळखी फरार झाला. ही घटना समजताच सदर बझार पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले. पंचनामा करुन आयुब याचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला. तृतीयपंथीयांच्या आक्रोशाने परिसरात खळबळ उडाली. दरम्यान, आयुब याने काही दिवसांपूर्वी प्रभाग 16 मधून महापालिका निवडणूक लढविणार असल्याचे जाहीर केले होते. त्याच्या खूनाने यातील गूढ वाढले आहे. दरम्यान, सदर बझार पोलिस ठाण्यात रात्री उशीरा गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.