

टेंभुर्णी : गोळीबाराच्या घटनेने टेंभुर्णी परिसर पुन्हा एकदा हादरला आहे. मंगळवारी (दि.९) रात्री कलाकेंद्रात अज्ञात कारणाने तरुणांच्या दोन गटामध्ये भांडण झाले. त्यातून बाचाबाची झाली. याचे रुपांतर मोठ्या भांडणात झाल्याने एकाने त्यांच्याकडील रिव्हॉल्व्हरने जबर गोळीबार केला. यामध्ये पंढरपूरजवळील वाखरी येथील देवा कोठावळे (वय-३२) हा एक गोळी मांडीत घुसून तरुण गंभीर जखमी झाला आहे. त्याची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे समजते. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
याबाबत मिळालेली प्राथमिक माहिती अशी की, टेंभुर्णीपासून पाच किमी अंतरावरील वेनेगाव येथे असलेल्या कलाकेंद्रात रात्रीच्या सुमारास तरुणांच्या गटात तुफान राडा झाला. यावेळी झालेल्या भांडणाचा राग अनावर झाल्याने एकाने देवा कोठावळे याच्यावर रिव्हॉल्वर मधून गोळ्या झाडल्या. यामधील एक गोळी थेट कोठावळे याच्या डाव्या मांडीत घुसली. यामुळे मोठा गोंधळ उडाला.
जखमी कोठावळे यास टेंभुर्णी येथील खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून त्याच्या मांडीत घुसलेली गोळी शस्त्रक्रिया करून बाहेर काढण्यात आली आहे. जखमी देवा कोठवळे याची प्रकृती धोक्याबाहेर असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच टेंभुर्णी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती आटोक्यात आणली. घटनेनंतर पोलिसांनी तीन आरोपीस ताब्यात घेतले असून आणखी काहीजण पळून गेल्याचे समजते. या ठिकाणी उपविभागीय पोलीस अधिकारी अंजना कृष्णा व्ही.एस.टेंभुर्णी पोलीस ठाण्याचे पोनि नारायण पवार व वरिष्ठ पोलीस अधिकारी यांनी भेट दिली आहे.