

माळीनगर : माळशिरस तालुक्याच्या पूर्व भागातील गणेशगाव येथे आज (दि.२०) पहाटे एका ६० वर्षीय वृद्ध व्यक्तीच्या निर्घृण खुनाची घटना उघडकीस आल्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेने शांतताप्रिय गणेशगाव आणि आसपासच्या गावांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
मृत व्यक्तीचे नाव शन्नपा व्यंकू वाघमोडे (वय ६०, रा. गणेशगाव) असे आहे. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्या स्वतःच्या घराचे बांधकाम सुरू होते. रात्रीच्या वेळी ते या बांधकाम सुरू असलेल्या बंगल्यात एकटेच झोपले होते. सकाळी जेव्हा कुटुंबातील सदस्य त्यांना उठवण्यासाठी गेले, तेव्हा ते रक्ताच्या थारोळ्यात मृतावस्थेत आढळून आले. हा प्रकार पाहून कुटुंबीयांना मोठा धक्का बसला.
पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, हा खून अत्यंत क्रूर पद्धतीने करण्यात आला आहे. मारेकऱ्यांनी वाघमोडे यांचे डोके ठेचून आणि एक हात तोडून त्यांची निर्घृण हत्या केली. या अमानुष कृत्यामुळे परिसरात संतापाची लाट उसळली आहे.
घटनेची माहिती मिळताच अकलूज पोलीस ठाण्याचे पोलीस उपअधीक्षक नारायण शिरगावकर यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. तपासाला गती देण्यासाठी श्वानपथकालाही (डॉग स्कॉड) पाचारण करण्यात आले आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी अकलूज उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला असून, शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचे नेमके कारण आणि इतर तपशील स्पष्ट होतील. या प्रकरणी अकलूज पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा नोंदवण्यात आला असून, पोलीस उपअधीक्षक नारायण शिरगावकर यांनी सांगितले की, "याबाबत अधिक तपास सुरू असून, लवकरच या प्रकरणातील सत्य समोर आणले जाईल." पोलीस मारेकऱ्यांचा शोध घेण्यासाठी सर्व बाजूंनी तपास करत आहेत.