

करमाळा: करमाळा तालुक्यातील कुंभेज येथे करमाळा पोलिसांनी जोरदार कारवाई केली असून यामध्ये दोन लाख ५८ हजार २५० रुपये किमतीचा १० किलो गांजासह एका संशयित आरोपीला पकडण्यात यश मिळवले आहे. गौरव प्रकाश माल्हीकर वय २३ रा. दत्तनगर पुणे, मुळगाव गेवराई , जिल्हा बीड असे पकडलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे.
आज दिनांक २३ एप्रिल रोजी दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास करमाळा जेऊर रस्त्यावर कुंभेज फाट्यावर ही कारवाई केली आहे. याबाबतची अधिक माहिती अशी की, करमाळा पोलीस स्टेशनचे गोपनीय विभागाचे वैभव ठेंगल यांना खाबऱ्यामार्फत माहिती मिळाली की एक संशयित इसम कुंभेज येथे मादक पदार्थ घेऊन विक्री करण्यासाठी येत असल्याची खबर लागली.
यावेळी नव्याने पदभार घेतलेले वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजीत माने यांनी याबाबत वरिष्ठांना माहिती करून याबाबत सापळा रचला. यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक पोपट टिळेकर, पोलीस उपनिरीक्षक सुशील कुमार पाखरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वास शिनगारे, यासह हवालदार आप्पासाहेब लोहार, वैभव ठेंगल, मनीष पवार आदींचे पोलीस पथक तयार केले.
या सर्व पोलीस पथकाने कुंभेज परिसरात जाऊन ठिकठिकाणी सापळा रचला . कुंभेज फाटा येथे पोफळज रोडवर एक इसम आज २३ एप्रिल रोजी काळया रंगाची बॅग घेऊन दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास दिसून आला .यावेळी या पथकाने त्याला जागेवरच रंगेहात पकडले. यावेळी त्याची बॅग तपासले असता त्यामध्ये चक्क 10 किलो 300 ग्रॅम वजनाचा गांजा सापडला. न्यायालयाने त्याला २४ एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी ठोठावली आहे.