

सोलापूर : कॉलेज विद्यार्थ्यांना पिस्टलचा धाक दाखवून त्यांच्याकडील रोकड लुटणाऱ्या टोळीचा फौजदार चावडी पोलिसांच्या डी.बी. पथकाने छडा लावला. या प्रकरणात एका १९ वर्षीय तरुणाला अटक करण्यात आली असून, दोन विधी संघर्ष बालकांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्याकडून गावठी पिस्टल, चार जिवंत काडतुसे आणि गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल असा एकूण १ लाख ४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
पोलिसांच्या माहितीनुसार, २० मे रोजी सायंकाळी सिंहगड कॉलेज ते एमआयटी कॉलेज सर्व्हिस रोडवर अयान डोनगांवकर व त्याचे मित्र थांबले होते. त्यावेळी मोटारसायकलवरून आलेल्या तिघांनी पिस्टलचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर महंमद अनस खलीफा याच्याकडील ३ हजार ५०० रुपयांची रोकड जबरदस्तीने घेऊन तिघे पसार झाले.
घटनास्थळी सीसीटीव्ही नसल्याने पोलिसांनी परिसरातील हॉटेल व लॉजचे फुटेज तपासले. त्यातील अस्पष्ट फुटेजच्या आधारे तपास करताना पुण्यातील चाफेकर चौक परिसरातून एका विधी संघर्ष बालकाचा शोध लागला. त्याच्याकडून मिळालेल्या माहितीनंतर बाळे ब्रिज परिसरातून त्याचे दोन साथीदार ताब्यात घेण्यात आले. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक विकास देशमुख करीत आहेत.
पालकांसमक्ष चौकशी केली
पुण्यात सापडलेल्या विधी संघर्ष बालकाची पोलिसांनी पालकांसमक्ष चौकशी केली. त्यावेळी त्याने गुन्ह्याची माहिती देत सोलापुरातील दोन साथीदारांची माहिती पोलिसांना दिली. तसेच गुन्ह्यात वापरलेले पिस्टल व रोकड त्यांच्याकडे असल्याचे सांगितले. या माहितीवरून पोलिसांनी दोन्ही साथीदारांचा शोध घेत त्यांना ताब्यात घेतले.