

सोलापूर : सोलापूर शहरात विनापरवाना व बेकायदेशीररीत्या सुरू असलेल्या अवैध सावकारीला आळा घालण्यासाठी सहकार विभागाने मोठी कारवाई हाती घेतली असून, एका अवैध सावकारावर गुन्हा दाखल केल्याची माहिती शहर उपनिबंधक उमेश पवार यांनी दिली आहे.
शहरातील वज्रेश्वर नगर भागात अवैध सावकारी करणाऱ्यावर छापा टाकण्यात आला आहे. तेथे नागरिकांकडून घेतलेले कोरे चेक, कोरे बॉन्डपेपर आणि इसारा पावतीसह अनेक संशयास्पद दस्तऐवज जप्त करण्यात आले आहेत.
अंबिका नगर येथील रहिवासी जय लक्ष्मण पतंगे यांनी दिलेल्या तक्रारी अर्जाच्या अनुषंगाने सहकार विभागाने दोन विशेष पथके तयार केली होती. यातील एका पथकाने कर्णिक नगर, वज्रेश्वर नगर येथील युवराज अशोक जानकर यांच्या घराची झडती घेतली. या झडतीत त्यांच्याकडे लोकांकडून घेतलेले कोरे चेक, कोरे बॉन्ड, अनामत ठेव पावती, इसारा पावती, करारपत्र, खरेदीखत आणि वाहन खरेदी पावती यांसारखे महत्त्वाचे कागदपत्रे आढळून आले.
या प्रकरणी सहकार अधिकारी राजू नरहरी ढोणे यांच्या फिर्यादीवरून युवराज अशोक जानकर यांच्यावर महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम २०१४ च्या कलम ३९ व ४१ अन्वये एम.आय.डी.सी. पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, दुसऱ्या पथकाने केलेल्या कारवाईत निलेश चंद्रकांत हरे यांच्या घरी कोणतीही बेकायदेशीर कागदपत्रे आढळली नाहीत.
अवैध सावकारांची करा तक्रार
सोलापूर शहरात अवैध सावकारीसंदर्भात काही तक्रारी किंवा माहिती असल्यास नागरिकांनी न घाबरता तातडीने उपनिबंधक, सहकारी संस्था सोलापूर शहर यांच्या कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन शहर उपनिबंधक उमेश पवार यांनी केले आहे.