Solapur News : महापालिका आयुक्तांचा नवा शिक्का; अधिकाऱ्यांनी घेतला धसका

मनपाच्या हितासाठी पहिल्यांदाच प्रशासनात आगळावेगळा बदल
Solapur News
सोलापूर महानगरपालिका आयुक्त डॉ. सचिन ओंबासे
Published on
Updated on

रामेश्वर विभुते

सोलापूर : येथे जरी मी नव्याने पदभार घेतला असला, तरी सोलापूर शहराची पार्श्वभूमी आणि येथील सर्व गोष्टींचा विचार करता मी कामात सुसुत्रता यावी, कोणावरही अन्याय होऊ नये आणि जे होईल ते महानगरपालिकेच्या हिताचेच होईल यासाठी नव्यानेच हा शिक्का बनवला आहे. सोलापूर महापालिकेमध्ये पहिल्यांदाच हा शिक्का आणलेला आहे, अशी माहिती खुद्द महानगरपालिका आयुक्त डॉ. सचिन ओंबासे यांनी दैनिक ‘पुढारी'ला दिली.

माझे शिक्षण वैद्यकीय क्षेत्रात एमबीबीएस झाले असले, तरी शहराची दुखती नस मला माहित आहे. त्याचाही मी सखोल अभ्यास केलेला आहे. यासाठीच मी हा शिक्का सोलापूर महानगरपालिकेच्या इतिहासात पहिल्यांदा बनवलेला आहे. याचा अर्थ असा की माझ्यासमोर अनेक प्रकारचे प्रस्ताव येत असतात. त्याची पूर्णतः चौकशी करून सदरहू प्रस्ताव योग्य आहे किंवा या प्रस्तावात दिलेला मजकूर योग्य आहे का याची तपासणी करूनच तो कार्यवाहीसाठी सुनिश्चित करावा आणि पुढे प्रस्तावित करावा असा मजकूर या शिक्यामध्ये आहे. राज्यातील २९ महानगरपालिकांमध्येही असा शिक्का नाही. ज्याची अंमलबजावणी सोलापुरातूनच पहिल्यांदा होत आहे. साधारण दोन इंच लांब आणि चार इंच रुंदी असणारा मोठा शिक्का आम्ही नव्याने बनवलेला आहे. ज्यामुळे इथून पुढे कोणतेही कागदपत्र माझ्यासमोर आले तर त्याची शहानिशा करणे, त्याला योग्य ती चाळणी लावून त्यातून तो प्रस्ताव उत्तीर्ण होऊन पुढे आल्यावरच माझ्या टेबलवर येईल. यामुळे कामांमध्ये पारदर्शकता तर येईलच आणि कुणाचा त्यावरती आक्षेपही असणार नाही, हा विचार यामागे आहे.

असा आहे शिक्यावरती मजकूर

महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम १९४९ मधील सर्व संबंधित तरतुदी सर्वसाधारण सभा/ स्थायी समितीने पारित केलेल्या ठरावाची विधी संघटता महानगरपालिकेचे सर्वोच्च हित तसेच या विषयाशी संलग्न असलेल्या सर्व कायदेशीर व प्रशासकीय बाबींचा सखोल विचार करून संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी योग्य ती कारवाई सुनिश्चित करून प्रस्तावित करावी.

- आयुक्त सोलापूर महानगरपालिका

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news