

सोलापूर : सहकारी संस्थांच्या स्थगित झालेल्या निवडणुकांना शिथिलता मिळाली. गावपातळीवरील विविध सेवा सोसायट्या वगळता जिल्ह्यातील क आणि ड वर्गातील सहकारी संस्थांच्या निवडणूक घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील क मधील साठ आणि ड वर्गातील १२६ संस्थांच्या निवडणुका होणार आहेत.
त्यामुळे जिल्ह्यातील १८६ संस्थेच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला. यामध्ये क आणि ड वर्गातील संस्थांचा समावेश आहे. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पुढे ढकलण्यात आलेल्या सहकारी संस्थांच्या निवडणुकांबाबत राज्य शासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. दुष्काळग्रस्त जिल्ह्यांतील सहकारी संस्थांच्या निवडणुका स्थगित ठेवण्याच्या निर्णयात अंशतः सुधारणा करण्यात आली. सहकार विभागाने यासंदर्भात नुकताच शुद्धिपत्रक जारी केले आहे. राज्य शासनाने २५ सप्टेंबर आणि १४ ऑक्टोबर २०२६ रोजीच्या शासन निर्णयांद्वारे सोलापूर
जिल्ह्यासह राज्यातील ३०४ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केला होता. त्यामुळे संबंधित जिल्ह्यांतील सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, या निर्णयात काही अपवाद समाविष्ट करण्याची विनंती राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने शासनाकडे केली होती. त्यानुसार शासनाने स्थगितीच्या निर्णयात अंशतः बदल केला आहे.