

सोलापूर : दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळवून देण्यासाठी महसूल, ग्रामविकास व कृषी विभागाने प्रत्येक शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन जिओ टॅगिंगसह १०० टक्के शेती क्षेत्राचे पंचनामे पुढील आठ दिवसांत पूर्ण करावेत, असे सक्त निर्देश जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी दिले.
केवळ १० टक्के नमुना पाहणी न करता प्रत्येक शेतात जाऊन झालेल्या नुकसानीची नोंद पंचनाम्यात करावी. दररोज सायंकाळी झालेल्या पंचनाम्यांचा गोषवारा सादर करावा, असे आदेश जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांना दिले आहेत.
जिल्हाधिकारी कार्यालयात मंगळवारी (दि. २९) दुष्काळ आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी अपर जिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी, निवासी उपजिल्हाधिकारी अभिजित पाटील, कृषी अधिकारी शुक्राचार्य भोसले उपस्थित होते. दरम्यान, जिल्ह्यातील ९२ गावांमध्ये ८२ टँकरद्वारे सध्या पाणी पुरवठा करण्यात येत आहे. यासाठी ३३ विहिरी आणि १३ बोअर अधिग्रहित करण्यात आले आहेत.
चारा बियाण्यांसाठी एक कोटींचा निधी
जिल्ह्यात १०० ते १२० दिवस पुरेल एवढा चारा उपलब्ध असला तरी चारा बियाणे खरेदीसाठी एक कोटी रुपयांचा निधी नियोजन समितीमधून मंजूर करण्यात आला आहे. मंगळवारी त्यांची प्रशासकीय मान्यता देण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी सांगितले.
रोजगार, पाणंद रस्त्यांच्या कामांची मुदत वाढवा
मुख्यमंत्री बळीराजा पाणंद रस्त्यांची किमान २५० कामे प्रशासकीय मान्यतेवर आणावीत. तसेच व्हीजी रामजी योजनेअंतर्गत मंजूर कामे दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर ३१ मार्च २०२७ पर्यंत सुरू ठेवण्याचे नियोजन करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले.
मागणीनंतर पाण्याचा टँकर मिळणार ७२ तासांत
पाण्याच्या टँकरची मागणी आल्यास ७२ तासांत टँकर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. मुदतीत टँकर न दिल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा जिल्हाधिकाऱ्यांनी दिला. गावांकडून टँकरचा प्रस्ताव आल्यास ४८ तासांत मंजुरी देऊन पुढील २४ तासांच्या आत टँकर सुरू झाला पाहिजे. प्रस्ताव टपालातून न पाठवता थेट अधिकाऱ्यांकडे हस्तांतरित करावा, असेही निर्देश त्यांनी दिले.