

सोलापूर : वडिलांचे प्रेत घरात असताना धनश्री पवार हिने जड अंतःकरणाने दहावीचा मराठी पेपर दीड तास लिहिला होता. त्याचा निकाल लागला असून, तिला त्या पेपरमध्ये 65 गुण मिळाले आहेत.
शरदचंद्र पवार प्रशालेमध्ये इयत्ता दहावीच्या वर्गात शिकत असणाऱ्या धनश्री पवार हिचे वडील भिकाजी पवार यांचे 20 फेब्रुवारी रोजी दुःखद निधन झाले होते. घरात वडिलांच्या अंत्यविधीची तयारी सुरू होती. मात्र, प्रशालेचे मुख्याध्यापक तानाजी माने यांनी धनश्री व तिच्या नातेवाईकांना समजावून सांगत दोन तास अंत्यविधी पुढे ढकलायला लावून धनश्रीला दहावीचा मराठी पेपर देण्यासाठी घेऊन गेले होते. दीड तास धनश्रीने पेपर लिहून ती अर्ध्यातून वडिलांच्या अंत्यविधीला घरी आली होती.
शुक्रवारी दहावीचा निकाल लागला असून, धनश्रीला मराठी विषयाला 65 गुण मिळवून ती उत्तीर्ण झाली आहे. प्रशालेचे मुख्याध्यापक माने, शिक्षक राजाराम शितोळे, नितीन मिस्कीन, श्रीराम बरगंडे, आनंद कोळी, श्वेता बाळशंकर, सुलक्षणा भरगंडे, अर्चना शिंदे, स्वाती नागटिळक, मंजुळा संगा, वैशाली सोनटक्के यांनी धनश्रीच्या घरी जाऊन तिचा सत्कार केला आहे.
शिक्षणाची जबाबदारी शिक्षणाधिकारी घेणार का?
धनश्री पवार हिच्या वडिलांचा मृत्यू झाल्यानंतर तिने मराठी विषयाचा पेपर दिला होता. त्यावेळी तिला माध्यमिक शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांनी पेपर देण्यासाठी सहकार्य केले होते. तसेच तिच्या पुढील शिक्षणाचा खर्च करणार असल्याचे सांगितले होते. त्यामुळे धनश्री पवार हिचा पुढील शिक्षणाचा खर्च शिक्षणाधिकारी करणार का, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
वडिलांचे स्वप्न पूर्ण करणार : धनश्री पवार
दहावीनंतर व्होकेशनल कोर्स एमएलटी करून स्वतःच्या पायावर उभे राहून वडिलांचे स्वप्न पूर्ण करणार असल्याचे धनश्री पवार हिने सांगितले. याप्रसंगी धनश्रीची आई सुप्रिया पवार, भाऊ विजय पवार व मोठी बहीण वैष्णवी पवार उपस्थित होती.