

सोलापूर : शहर व परिसरातील कायमच खोदलेले रस्ते, उद्योगांसह वाहनांमधून मोठ्या प्रमाणावर बाहेर पडणारा धूर, रस्त्याच्या कडेला उघड्यावर पडलेला कचरा, सार्वजनिक मैदाने व विविध ठिकाणी असलेल्या कच्च्या रस्त्यावर पाणी न मारल्याने हवेत धुळीचे प्रमाण वाढले आहे. निरोगी जीवन जगण्यासाठी येथील हवा अशुद्ध असल्याने त्याचा मानवी आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. शहरवासीयांचे सार्वजनिक ठिकाणी शिंकणे अन् खोकणे हे नेहमीचेच बनले आहे. हवेतील शुध्दतेसाठी प्रयत्नांची गरज निर्माण झाली आहे.
उत्तम आरोग्यदायी जीवन जगण्यासाठी शुद्ध हवेची गरज आहे. मात्र वाढत चाललेल्या प्रदूषणामुळे मानवी आरोग्य धोक्यात आले आहे. येथील हवेतील प्रदूषणाचा मुद्दा महत्त्वाचा बनत आहे. येथील हवेच्या गुणवत्ता निर्देशांकांत सतत वाढ होत आहे. निरोगी जीवन जगण्यासाठी या शहराची हवा अशुद्ध ठरत आहे. शुद्ध हवेचा गुणवत्ता निर्देशांक हे (एक्यूआय) 0 ते 50 असतो. या स्तरातील हवेतील प्रदूषणाचे प्रमाण कमी असते. सध्या येथील हवेतील गुणवत्ता निर्देशांक 101 ते 155 दरम्यान आहे. या प्रकारातील हवा आरोग्यास धोकादायक व त्रासदायक मानली जाते. यामुळे, नागरिकांना दमा, धाप लागणे अशा अनेक प्रकारच्या श्वसनांच्या त्रासाला सामोरे जाण्याची वेळ येत आहे.