

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील अकराही तालुक्यांचा दुष्काळाच्या ट्रिगर १ मध्ये समावेश झाला असून, पुढील दहा महिने म्हणजे जून २०२७ पर्यंत पाणी पिण्यासाठी आरक्षित केले जाणार आहे. त्या पार्श्वभूमीवर सोलापूरसह शहरी भागात १० टक्के पाणी कपात लागू केली जाणार आहे. त्यामुळे जलस्रोत पिण्यासाठी राखीव केल्यानंतर जलसाठ्यात पाणी शिल्लक राहिल्यास ते सिंचनासाठी दिले जाणार आहे. त्यामुळे उभा ऊस तहानलेलाच राहणार आहे. तर नवीन ऊस लागवडीवर विपरीत परिणाम होणार आहे.
शासनाने शहरी भागांत १० टक्के पाणीकपात लागू करून हे बचत केलेल पाणी पुढील वर्षाच्या जून महिन्यासाठी 'बफर झोन' म्हणून सुरक्षित ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. पिण्याचे पाणी आणि जनावरांचा चारा यांना प्रथम प्राधान्य दिले जाईल. गावतलाव व पाझरतलाव पिण्याच्या पाण्यासाठी आरक्षित राहणार आहे. पाणी वाटपाचा क्रम पिण्याचे पाणी, चारा पिके, रब्बी पिके (गहू इ.) आणि शेवटी ऊस पीक असा असावा, अशा सक्त सूचना राज्य शासनाने जिल्हा प्रशासनाला दिल्या आहेत.
पिण्याच्या पाण्याची अडचण असलेल्या भागात वैयक्तिक व व्यावसायिक बांधकामांच्या परवानगी तात्पुरत्या स्थगित करण्याच्या सूचना संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना राज्य शासनाने दिल्या आहेत. त्यामुळे बांधकामांनाही ब्रेक लागणार आहे. मोठ्या बांधकामांवर बंदी आणण्याबरोबरच सिमेंटचे रस्ते आणि पाण्याचा अपव्यय होईल अशी कामे टाळण्याच्या सूचनाही दिल्या आहेत.