

सोलापूर : येथील जात पडताळणी समितीच्या कार्यालयात जात पडताळणीचा प्रस्ताव दाखल करण्यासाठी चार-चार तास वेळ लागत असून दाखला मिळण्यासाठी किती दिवसाचा कालावधी लागेल, अशी भावना प्रस्तावक विद्यार्थ्यांमधून व्यक्त केली जात आहे.
सध्या शाळा-महाविद्यालय चालू झालेले आहेत. अनुसूचित जाती-जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग अन्य आरक्षित घटकातील विद्यार्थ्यांना ज्या त्या प्रवर्गातूनच प्रवेश घ्यावा लागतो. यासाठी संबंधित शाळा किंवा महाविद्यालयात जात पडताळणीचा दाखला सादर करावा लागतो. तरच, आरक्षित प्रवर्गातून प्रवेश अंतिम ठरतो. अन्यथा, सर्वसाधारणमधून प्रवेश समजला जातो. यासाठी शहर जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील मुलांनी ऑनलाईन प्रस्तावानंतर पुन्हा छायांकित प्रतचे सत्यप्रत करून कार्यालयाला द्यावी लागते. यासाठीच येथील कार्यालयाच्या बाजूला असलेल्या सांस्कृतिक भवनात तीन ते चार खिडकीची व्यवस्था जातपडताळणी विभागाकडून केली आहे.
मंगळवारी (दि. 8) दिवसभर येथे अर्जदारांची गर्दी होती. एकेका प्रस्तावकाला चार तासाहून अधिक वेळ येथे थांबून प्रस्ताव सादर करावे लागले. अर्ज दाखल करण्यास जर चार- चार तास वेळ लागत असेल तर प्रत्यक्षात दाखला मिळायला किती दिवसाचा कालावधी लोटेल, अशी भावना उपस्थित विद्यार्थ्यांमधून व्यक्त केली जात होती.