

माळीनगर : माळशिरस तालुक्यातील गट नं.2 ते महाळुंग चौकी दरम्यानच्या संत चौरंगीनाथ महाराज पालखी मार्गाची अत्यंत दुरवस्था झाली आहे. या रस्त्याचे तत्काळ डांबरीकरण करण्यात यावे, अशी नागरिकांची मागणी आहे.
गट नं.2 ते चिंतामणी वस्ती व तेथून पुढे महाळुंग चौकीपर्यंत नीरा कालव्याच्या कॅनॉल पट्टीचा हा रस्ता आहे. केडगाव (ता.दौंड) येथील संत चौरंगीनाथ महाराज पालखी सोहळा या मार्गाने वाटचाल करून पुढे श्रीपूरकडे मार्गस्थ होत असतो. सध्या या रस्त्याची अवस्था अतिशय दयनीय झाली आहे. गट नं.2 ते चिंतामणी वस्तीपर्यंतच्या रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत. या खड्ड्यातून मार्ग काढताना वाहने नीरा कालव्याच्या उपफाट्यात उलटण्याची भीती वाहनचालकांना वाटते.
चिंतामणी वस्तीपासून महाळुंग चौकीपर्यंतच्या रस्त्यावरचे डांबर कुठेच शिल्लक राहिल्याचे दिसत नाही. रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून खडीने डोकेवर काढले आहे. वाहनचालकांना या रस्त्यावरून वाहने चालवताना चांगलीच कसरत करावी लागत आहे. हा रस्ता केवळ पालखीमार्गच नव्हे तर केळी, ऊस, दूध, भाजीपाला या शेती उत्पादनांच्या वाहतुकीसाठीही महत्त्वाचा आहे. त्यामुळे प्रशासनाने याची गांभीर्याने दखल घेऊन या रस्त्याचे पावसाळ्यापूर्वी डांबरीकरण करावे, अशी भाविकांची अपेक्षा आहे.