

पोखरापूर : दूषित सांडपाण्यामुळे बाधित झालेल्या चिंचोली काटी एमआयडीसी परिसरातील १५८ हेक्टर शेतजमिनीच्या संपादनाचा मार्ग अखेर मोकळा झाला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमवेत झालेल्या बैठकीनंतर उद्योगमंत्री उदय सामंत यांनी या प्रस्तावास मान्यता दिली. त्याची अधिसूचना महिनाभरात काढण्यात येणार आहे, अशी माहिती आ. राजू खरे यांनी दिली.
मोहोळ तालुक्यातील चिंचोली काटी एमआयडीसी परिसरातील कंपन्यांनी केमिकलचे पाणी सोडल्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांची १५८ हेक्टर जमीन खराब झाली आहे. ती ताब्यात घेऊन संबंधित शेतकऱ्यांना बाजारभावाप्रमाणे नुकसान भरपाई द्यावी, तरच त्या शेतकऱ्यांना न्याय मिळेल, अशी मागणी करीत या गंभीर प्रश्नावर मोहोळचे आमदार राजू खरे यांनी विधिमंडळात दोनवेळा लक्षवेधी मांडून शासनाचे लक्ष वेधले होते. त्यानंतर अधिवेशनादरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दालनात उद्योगमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक झाली.
शेतकऱ्यांच्या मालकीच्या १५८ हेक्टर जमिनीचे भूसंपादन रेडीरेकनर दरानुसार करण्याचा निर्णय झाला. चिंचोली काटीतील शेतकऱ्यांनी एमआयडीसीसाठी जमिनी देण्यास सहमती दर्शवली आहे. एकरी ३५ ते ४० लाख रुपयांची मागणी असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. जमिनी घेण्याची कार्यवाही सुरू होणार असल्याने शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.