Solapur News : चंद्रभागा वाळवंटातून २३ टन कचरा संकलित

पंढरपूर नगरपरिषदेच्या पुढाकाराने व सामाजिक संस्थांच्या सहाय्याने स्वच्छता अभियान उत्साहात
Solapur News : चंद्रभागा वाळवंटातून २३ टन कचरा संकलित
Published on: 
Updated on: 

पंढरपूर : पंढरपूर शहरातील चंद्रभागा वाळवंट परिसर स्वच्छ, सुंदर व निर्मळ ठेवण्याच्या उद्देशाने पंढरपूर नगरपरिषदेच्या पुढाकाराने आज बुधवार, दि.२१ रोजी चंद्रभागा वाळवंट परिसरात विशेष स्वच्छता अभियान राबविण्यात आले. या अभियानास विविध सामाजिक, धार्मिक व शैक्षणिक संस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत २३ टन कचरा उचलण्यात आला आहे.

पंढरपूर नगरपरिषद, पालवी संस्था, कवठेकर प्रशाला नाथ चौक, विठ्ठल रुक्मिणी आध्यात्मिक वारकरी शिक्षण संस्था, वेदांत गुरुकुल, क्रेडाई पंढरपूर, तिरूपती कन्ट्रक्शन पंढरपूर, श्री जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था, त्याचबरोबर जोगदंड महाराज वारकरी शिक्षण संस्था पंढरपूर यांच्या संयुक्त विद्यमाने हे स्वच्छता अभियान आयोजित करण्यात आले.

या अभियानामध्ये संबंधित संस्थांचे पदाधिकारी व स्वयंसेवक, शाळांचे विद्यार्थी पंढरपूर नगरपरिषदेचे सर्व विभागाचे कर्मचारी प्रशासन, बांधकाम, पाणीपुरवठा, नगररचना, संगणक, आरोग्य, विद्युत, भांडार, उद्यान तसेच लेखा व कर विभागाचे प्रमुख व त्यांच्या अधिनस्त कर्मचारी, मुख्याधिकारी महेश रोकडे नगराध्यक्षा. प्रणिता भालके, नगरसेवक ओंकार जोशी यांनी सहभाग घेतला. चंद्रभागा वाळवंट परिसरात राबविण्यात आलेल्या या विशेष स्वच्छता अभियानामध्ये मोठ्या प्रमाणावर कचरा संकलित करण्यात आला.

अभियानादरम्यान तब्बल २३ टन कचरा संकलित करून त्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावण्यासाठी व्यवस्था करण्यात आली. स्वयंसेवक, कर्मचारी, विद्यार्थी व नागरिकांनी श्रमदानातून परिसरातील कचरा, प्लास्टिक व इतर घनकचरा संकलित करून परिसर स्वच्छ केला. या अभियानाच्या माध्यमातून सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता, कचरा व्यवस्थापन, प्लास्टिकमुक्त परिसर आणि पर्यावरण संवर्धनाबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात आली असल्याची माहिती नगराध्यक्षा प्रणिता भालके तसेच मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी दिली.

या वाळवंटामध्ये अवघ्या महाराष्ट्राची क्रांती झालेली आहे. अशा या वाळवंटामध्ये काही अपप्रवृत्ती व अंधश्रध्देमुळे स्वच्छ असलेले वाळवंट अस्वच्छ होत आहे. परंतु, चंद्रभागा वाळवंट स्वच्छ राहावे याकरिता पंढरपूर नगरपरिषद व वारकरी संघटना व संस्था यांनी सहभागातून स्वच्छता अभियान राबवले जात आहे. ते कौतुकास्पद आहे. या अभियानात आमच्याही वारकरी संस्थेचे वारकरी सहभागी होऊन स्वच्छता करणार आहोत. हे स्वच्छता अभियान कायमस्वरूपी राबत राहो.
- ह.भ.प. बंडातात्या कराडकर

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news