

देशाची लोकवाहिनी म्हणून ओळखल्या जाणार्या झुक झुक रेल्वे गाडीचा वेग चांगलाच वाढला आहे. एकीकडे विकासाचे इंजिन आणि दुसरीकडे उत्पन्नाचे नवनवे स्रोत शोधून रेल्वे प्रशासन आपल्या तिजोरीत भरभरून माप घालत आहे. मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागाने 2024-25 या आर्थिक वर्षात तिकीट तपासणीत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. तिकीट तपासणी मोहिमेद्वारे 11 कोटी 83 लाखांची कमाई केली आहे.
रेल्वे प्रशासनाने मागील काही वर्षात प्रवासी वाहतूक आणि मालवाहतुकीत बदल केले आहेत. वेगवेगळे जोड देऊन उत्पन्नाचे स्रोत वाढविले आहेत. त्यात मालवाहतुकीच्या पारंपरिक साधनांतील विस्तार केला. साखर, अन्नधान्य, सिमेंट, कोळसा, लोखंड, वाहने वाहतूक करून रेल्वेने आपल्या उत्पन्नात वाढ केली आहे. एप्रिल 2024 ते मार्च 2025 अखेरपर्यंत तिकीट तपासणीच्या एकूण 10 हजार 987 मोहिमा राबविल्या. ज्यात 850 विशेष सघन मोहिमा, 64 स्पॉट चेक आणि 36 अॅम्बुश, क्रॉस-कंट्री आणि फोर्ट्रेस चेकचा समावेश आहे.
यात दोन लाख 51 हजार 30 प्रकरणांमधून एकूण 11 कोटी 82 लाख 86 हजार 960 रुपये वसूल केले आहेत. ही कामगिरी सोलापूर रेल्वे विभागाचे वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक योगेश पाटील यांच्या मार्गदर्शनामुळे आणि सहाय्यक वाणिज्य व्यवस्थापक (तिकीट तपासणी) कल्पना बनसोडे आणि त्यांच्या सक्रिय तिकीट तपासणी पथकाच्या नेतृत्वाचे परिणाम आहे.
अनेक कर्मचार्यांनी त्यांच्या कर्तव्यांपेक्षाही जास्त काम केले आहे. यावर्षी तिकीट तपासणी कर्मचार्यांनी दक्षता आणि सार्वजनिक सेवेची प्रेरणादायी कामेही पाहिली आहेत. यात गाडी (क्रमांक 12115) सिद्धेश्वर एक्स्प्रेसच्या कोच एस 3 आणि एस 4 मध्ये असामान्यता नोंदवल्याबद्दल लेखराम मीना यांना जनरल मॅनेजर सेफ्टी अॅवॉर्ड मिळाला. जीवन इंगळे यांनी गाडी (क्रमांक 11020) कोणार्क एक्स्प्रेसमध्ये हॉट अॅक्सल आढळून आला. ज्यामुळे संभाव्य दुर्घटना टळली. राहुल एस. कांबळे यांनी गाडी (क्रमांक 12116) सिद्धेश्वर एक्स्प्रेसमध्ये हॉट अॅक्सल आढळून आला. ज्यामुळे सुरक्षित ऑपरेशन सुनिश्चित झाले. संतोष एन. प्रसाद यांनी गाडी (क्रमांक 12627) कर्नाटक एक्स्प्रेसमधील दोन अल्पवयीन मुलींना वाचवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.