

टेंभुर्णी : सुरत येथे कपडे खरेदीसाठी टेम्पोमधून निघालेल्या चडचण (जि.विजयपूर) येथील व्यापाऱ्याच्या सेल्समनला व टेम्पोचालकास चार जणांनी चाकूचा चाक दाखवून व हाताने ठोसे मारून जखमी करत त्यांच्या ताब्यातील तीन कोटी रूपयांची रोख रक्कम पळवून नेली. याप्रकरणी दोन आरोपींना जेरबंद केले आहे.
ही घटना 11 मे रोजी मध्यरात्री 2.17 वा.सुमारास टेंभुर्णी-करमाळा रोडवरील अकोले-खुर्द येथे टोलनाक्याच्या जवळ घडली होती.दोन्ही आरोपींना सहा दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.दोन आरोपीचा शोध सुरू आहे.या प्रकरणी सेल्समन धुंडाप्पा रामान्ना खलाटे (रा.गोट्याळ ता.चडचण,जि. विजापूर) यांनी 19 मे रोजी फिर्याद दिली होती.गुन्हा दाखल झाल्यानंतर घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तपासासाठी दोन स्वतंत्र पथकाची स्थापना केली होती.तसेच हा तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाकडे सोपविला होता.
सिद्धेश्वर नामदेव माने, (वय 34,रा.पालखी मार्ग, मोडनिंब, ता.माढा) व अजित नामदेव सुर्वे (वय 26, रा.पांढरेवस्ती,पालखी मार्ग, अरण रोड, मोडनिंब) अशी पोलीस कोठडी सूनावलेल्या आरोपींची नावे आहेत.तर शुभम शहाजी पाटील (रा.रानमळा,मोडनिंब) व विकी राजाभाऊ गिड्डे(रा.गणपती मंदिरा जवळ दत्तनगर मोडनिंब) अशी फरार आरोपींची नावे आहेत.
याबाबत टेंभुर्णी पोलीस ठाण्यातून मिळालेली अधिक माहिती अशी की,चडचण येथील साड्यांचे प्रसिद्ध व्यापारी बाहुबली एन.मूर्ती यांनी त्यांचे सेल्समन धोंडाप्पा खलाटे यांना मोडनिंब येथील विश्वास खंदारे यांचा टेम्पो भाड्याने घेऊन सुरत येथून साड्या आणण्यासाठी रोख तीन कोटी रुपये पोत्यात भरून दिले होते.सोबत जुना परत करावयाचा माल ही घेऊन जात होते.
11 मे रोजी रात्री एकच्य सुमारास मोडनिंब येथे आले असता मालकाने टेम्पो बदलून नागनाथ सुर्वे रा. बैैरागवाडी (ता.माढा) यांच्या टेम्पो मधून पुढील प्रवास करावा असे सांगितले. तेथून सुनील नागनाथ सुर्वे,नागनाथ सुर्वे व धोंडाप्पा खलाटे असे तिघेजण निघाले. ते करमाळा रोडवरील अकोले खुर्द हद्दीतील जुन्या टोलनाक्याच्या पुढे आले असता विना नंबरची चार चाकी स्विफ्ट कार टेम्पोला आडवी लावण्यात आली. चौघांनी टेम्पो मधील लोकांना चाकूचा धाक दाखवून हाताने ठोसे मारले. टेम्पोच्या केबिनच्या वरील बाजूस ठेवलेले तीन कोटी रुपये रक्कम असलेली पोती घेऊन सर्वजन पसार झाले. स्थानिक गुन्हे शाखेचे सहा. पोलिस निरीक्षक वाघ यांनी गुन्ह्याचा यशस्वी तपास करून दोघांना अटक करण्यात आली.