

सोलापूर : कंटेनर आणि कारचा भीषण अपघात होऊन कारमधील दोन तरुण जागेवरच ठार झाल्याची घटना शुक्रवारी (दि.13) रात्री विजापूर बायपास रोडवर घडली. इमामुद्दिन जियाउल्लाह बागवान (वय 18), अमन निसार बागवान (वय 19, दोघे रा. रंगराज नगर, हैदराबाद रोड सोलापूर) अशी दोघांची नावे आहेत.
शुक्रवारी सायंकाळी इफ्तारनंतर इमामुद्दीन आणि अमन हे कार घेऊन चहा पिण्यासाठी तसेच फेरफटका मारण्यासाठी बाहेर पडले. केगाव ते हत्तूर विजापूर रोड बायपासवर आल्यानंतर काही अंतरावर त्यांची कार आणि कंटेनरची जोरदार धडक बसली. यामध्ये कारचा संपूर्ण चक्काचूर झाला. अपघातस्थळी रक्ताचा सडा पडला होता. दोघांना तत्काळ शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु दोघेही उपचारापूर्वीच मयत झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. या घटनेची माहिती मिळताच दोघांच्या नातेवाईकांनी शासकीय रुग्णालयात धाव घेतली. ऐन रमजान महिन्यात दोन युवकांचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.