

पोखरापूर : पालखी सोबत पायी पंढरपूरला निघालेल्या वारकर्याला एका इनोव्हा गाडीने धडक देऊन झालेल्या अपघातात त्याचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी शेटफळ माढा मार्गावर रात्री दहाच्या सुमारास घडली.
आकाश करणाराव कोंडलकर (वय 30 रा. हनुमान मंदिर, बालाजी वार्ड, गोपालपुरी चंद्रपूर) असे मृत वारकर्याचे नाव आहे. आकाश कोंडलकर व त्यांचे काही मित्र सद्गुरू जगन्नाथ महाराज (वेगाव जि. यवतमाळ) या पालखीमध्ये सहभागी होऊन (वणी, जि. यवतमाळ) येथून पायी पंढरपूरला निघाले होते. या पालखीत सुमारे 300 वारकर्यांचा सहभाग आहे. सदरची पालखी बार्शी मार्गे पंढरपूरला जात असताना ती शेटफळ गावच्या हद्दीत आली. त्यावेळी उशीर झाल्याने पालखी सोबतचे सर्व वारकरी माढा रोडवरील हनुमंत लवटे यांच्या शेतात मुक्कामी थांबले.
दरम्यान मुक्कामाच्या ठिकाणी चिखल असल्याने व सर्वांना जागा पुरत नसल्याने आकाश कोंडलकर व त्यांचे काही मित्र पायी चालत शेटफळच्या दिशेने दुसरीकडे जागा मिळते का ते पाहण्यासाठी निघाले होते. त्यावेळी अचानक शेटफळकडे भरधाव जाणार्या एका अज्ञात इनोवा कारने कोंडलकर यांना जोराची धडक दिली. त्यात ते गंभीर जखमी झाल्याने त्यांना रुग्णवाहिकेतून उपचारासाठी तातडीने मोहोळ येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता, डॉक्टरांनी त्यांना उपचारापूर्वीच मृत घोषित केले. या घटनेची खबर अमित सुंदरलाल लोहिया (रा. विठ्ठल रुक्मिणी विला, चंद्रपूर) यांनी दिली.