

सोलापूर : येथील परिवहन महामंडळाच्या आगारात तीन गेट आहेत. या तीनही गेटमधून प्रवाशांसह दुचाकीवरून फेरफटका मारणारे व रिक्षा आणि मोकाट कुत्र्यांचा मुक्त वावर असतो. मुख्य बसस्थानकासह मराठवाडा व ग्रामीणच्या बसस्थानकामध्येही फिरतात. प्रवासी बसतात. त्या बाकावर व बाकाच्या बाजूलाही बसतात. फलाटावर बस लागली असल्यास तिकडे जाण्याच्या घाईत मोकाट कुत्र्यांच्या अंगावर पाय पडण्याची शक्यता असतेच. अशावेळी कुत्रा चावूही शकतो.
तळीरामांसाठी तर आगार हे विश्रांतीचे ठिकाणच बनले आहे. ग्रामीण व मराठवाडा बसस्थानकातील अनेक बाकड्यांवर तळीराम विश्रांती घेतांना दिसतात. ज्याठिकाणी हे तळीराम आराम करतात, तेथेच अनेक वेळा घाण करतात. याच्या दुर्गंधीचा त्रास हा प्रवाशांना होतो. सुरक्षारक्षक करतात तरी काय...असा प्रश्न हे सर्व चित्र पाहिल्यावर कोणालाही पडतो. येथील आगारात तीन ठिकाणी प्रवाशी बसतात. तीन गेट असूनही दोनच गेटने बसेस आगारात येतात. रिक्षासारखी वाहने तीनही गेटमधून आत येतात.
आगारात ये-जा करणाऱ्या बसेसची संख्या मोठी असल्याने बसचालकांना दमछाक होत असते. त्यातच रिक्षा व दुचाकीची भर. एसटीच्या कर्मचाऱ्यांशिवाय अन्य नागरिकही येथे बसस्थानकातील विविध असलेल्या सावलीत तासन्तास दुचाकी लावलेली दिसते. त्यांच्यावर कारवाई होत नाही.
शिवाय येथील सुरक्षेची जबाबदारी ज्या संस्थेवर आहे, त्यांचे सुरक्षा कर्मचारी अनेक वेळा पोलिसांच्याच खुर्चीवर बसून राहतात. एकंदर येथील बसस्थानक म्हणजे कुत्र्यापासून ते तळीरामांसाठी आश्रयाचे ठिकाणचं बनले आहे. वाहनांचे तर सोडाच, येथील हे सर्व चित्र पाहून प्रवाशी उपहासात्मकपणे आओ जाओ घर तुम्हारा असे म्हणतांना दिसतात. बसचालकांना सुरक्षितपणे आगारात बस लावण्यासाठी येथील अतिक्रमण काढले पाहिजे.
कचरा करणारे छोटे विक्रेते
आगारात वावरणाऱ्या अनधिकृत फेरीवाल्यांचा शोध हा घेतला पाहिजे. हे विक्रेते सतत फिरून पाणी, बिस्कीट, चॉकलेट आणि विविध फळ विक्री करतात. आगारातील फेरीवाल्यांना कचरा पडू नये याची तंबी दिली पाहिजे. कारण या विक्रेत्यांमुळेही कचऱ्यात भर पडतेच.