Solapur Murder Case | हात तोडले, डोके ठेचले, रक्ताच्या थारोळ्यात आढळला मृतदेह
माळीनगर : माळशिरस तालुक्यात शुक्रवारी (दि. 20) भल्या पहाटे गणेशगावमध्ये शन्नपा व्यंकू वाघमोडे (वय 60) यांचा निर्घृण खून झाल्याचे उघड झाले. या खुनाचे कारण समजू शकले नाही. खून अतिशय क्रूरतेने करण्यात आला आहे. डोके ठेचून, हात तोडून मारण्यात आल्याने मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे पोलिसांनी सांगितले.
शन्नपा व्यंकू वाघमोडे यांचे स्वतःच्या घराचे बांधकाम गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहे. या बांधकामात रात्रीच्या वेळी वाघमोडे झोपले होते. सकाळी परिवारातील सदस्य त्यांना उठवण्यासाठी गेले असता ते रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे आढळून आले.
याची माहिती मिळताच अकलूजचे पोलीस उपअधीक्षक नारायण शिरगावकर यांनी घटना स्थळाला भेट दिली. तपासासाठी डॉग स्कॉड पाचारण करण्यात आले. शवविच्छेदनासाठी मृतदेह अकलूज उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. खून का व कोणी केला, याबाबत तपास सुरू असल्याचे पोलीस उपअधीक्षक नारायण शिरगावकर यानी सांगितले.

