

टेंभुर्णी : आई-वडिलांचे छत्र हरपलेल्या व दारिद्य्राने छळलेल्या एका 15 वर्षाच्या मुलास त्याचा दृष्टीचा दिवा ही विझू पहात असताना त्याच्या दोन्ही डोळ्यावर मोफत शस्त्रक्रिया करून टेंभुर्णीतील डॉक्टरांनी माणुसकी अजून जिवंत आहे याचा प्रत्यय दिला.
लहानपणीच आईचा मृत्यू झाल्याने आणि अवघ्या सहा महिन्यांपूर्वी वडीलांचे छत्र हरपलेला लक्ष्मण अशोक गोरे हा दृष्टी गमावण्याच्या उंबरठ्यावर उभा होता.अशा स्थितीत हा मुलगा आणि त्याची वृद्ध आजी मंगल किसन गोरे (रा. तेलंगवाडी, ता. मोहोळ) ही उपचारासाठी धडपड करीत होती.ती चिंताक्रांत होत होती.आजीने शेवटचा पर्याय म्हणून तिचं उरल-सूरलेलं मोजकं दागिनं विकून उपचार करण्याचा विचार मनात आणला. डॉ. आनंदराव खडके यांचं नाव ऐकून त्यांच्याकडे आली. डॉ. खडके यांनी दागिने विकू नका. उपचाराची सगळी जबाबदारी आमची आहे.असे सांगितले.
यानंतर डॉ.खडके यांनी मुलाची नेत्रशस्त्रक्रिया संपूर्ण मोफत केली.या शस्रक्रियेसाठी महत्त्वाची भूमिका असणारे भूलतज्ज्ञ डॉ.रोहित संचेती यांनी ही आपली सेवा मोफत दिली. वैद्यकीय फिटनेस प्रमाणपत्र बालरोगतज्ज्ञ डॉ.उमेश झाडबुके यांनी व फिजिशियन डॉ.महेश खडके यांनी मोफत दिले. रेडिओलॉजिस्ट डॉ. सुहास अनंतकवळस यांनी मुलाच्या डोळ्याची मोफत सोनोग्राफी करून दिली.सर्व रक्ताच्या तपासण्या सिद्धायी लॅबचे सोनवणे यांनी तर सर्व औषधे फार्मासिष्ट रविकिरण मिटकल यांनी तसेच ऑपरेशन सहाय्यक दिनेश मिश्रा यांनीही आपली सेवा पूर्णतः निशुल्क दिली.