

सोलापूर : सोलापूर शहरालगतच्या दक्षिण सोलापूर तालुक्यातील बोरामणी गावात संपत्तीच्या वादातून मोठ्या भावाने विधवा भावजय, पुतणी आणि पुतण्याचा तलवारीने सपासप वार करत केलेल्या तिहेरी हत्याकांडाने जिल्हा हादरला आहे.
प्राथमिक माहितीनुसार, मयत गायत्री सुधाकर मस्के (वय 45) या पतीच्या निधनानंतर मुलगी प्रिया मस्के (वय 18) आणि मुलगा शिवराज मस्के (वय 16) यांना घेऊन अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत कसाबसा संसार करत होती. मात्र, काही दिवसांपासून संपत्तीच्या वाटणीवरून त्यांचे दिरासोबत वाद होत होते. संशयित आरोपी शंकर उर्फ पप्पू मस्के हा मध्यरात्री घरातून हातात तलवार घेऊन गच्चीवर गेला. त्यावेळी मयत तिघे गच्चीवर झोपले होते. तेथे गेल्यावर संशयिताने प्रथम भावजय गायत्री यांच्यावर तलावारीने सपासप वार केल्याचे समोर येत आहे. आईवर होत असलेला जीवघेणा हल्ला पाहून मुलगी प्रिया आणि मुलगा शिवराज हे आईला वाचवण्यासाठी मध्ये पडले.
मात्र, क्रूरतेचा कळस गाठत संशयिताने आई आणि मुलीवर तलवारीने वार करत त्यांना संपवले. घटनेनंतर संशयित तलवार तसेच त्याचा मोबाईल आणि साहित्य तिथेच ठेऊन पसार झाला. आई आणि मुलगी गच्चीवर रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या अवस्थेत आढळून आल्या, तर मुलगा घराच्या खालील भागात मृतावस्थेत सापडला. या भीषण घटनेची माहिती मिळताच तालुका पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक राहुल देशपांडे तसेच गुन्हे शाखेचे पथक, फॉरेन्सिक टीम तातडीने घटनास्थळी दाखल झाले. संपूर्ण परिसर पोलिस बंदोबस्तात घेण्यात आला असून पुरावे संकलन करुन पंचनामा करण्यात आला.
दरम्यान उपविभागीय पोलिस अधिकारी संकेत देवळेकर यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. दुपारी सर्वांचे मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले. रात्री उशीरापर्यंत पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल झाली नव्हती.
संपत्तीमुळे वाद वाढला
मस्के कुटुंबात मोठा शंकर, मधला सुधाकर आणि लहान प्रदिप असे तीन भाऊ. तिघांनीही एकत्रपणे सारखी घरे बांधली. त्यांचे गावातच हॉटेल आहे. तीनही भावांपैकी सुधाकर आणि प्रदिप यांचे निधन झाले. सुधाकर याला दोन मुले होती. शंकर याचा मुलगा हॉटेलचे कामकाज बघत होता. दोन भावांच्या निधनानंतर त्यांच्यातील संपत्तीचा वाद अधिक वाढत गेला. याच रागातून शंकर याने हे कृत्य केल्याची चर्चा गावात होती.
मुलगी प्रियाला 68 टक्के, मुलगा शिवराजला 61 टक्के गुण
घरातील कर्त्या पुरुषाचा आधार हरपलेले हे कुटुंब जगण्यासाठी संघर्ष करत होते. आई लेकरांना घेऊन संसाराचा गाडा ओढत होती. मुलगी प्रिया हिचा बारावी सायन्सचा निकाल दुपारी लागला असून तिला 68.63 टक्के गुण मिळाले. तर मुलगा शिवराज याला दहावी सीबीएसस्सीमध्ये 61. 82 टक्के गुण मिळाले आहेत.या घटनेनंतर बोरामणी परिसरात प्रचंड संताप आणि हळहळ व्यक्त होत आहे.